मंडईची वास्तू पडूनच; रहिवाशांना घ्यावी लागते डोंबिवलीत धाव

By admin | Published: August 21, 2015 02:17 AM2015-08-21T02:17:37+5:302015-08-21T02:17:37+5:30

वाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत

The Mandai Vaastu only; Residents have to take Dombivli | मंडईची वास्तू पडूनच; रहिवाशांना घ्यावी लागते डोंबिवलीत धाव

मंडईची वास्तू पडूनच; रहिवाशांना घ्यावी लागते डोंबिवलीत धाव

Next

अनिकेत घमंडी, डोंबिवली
वाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. केडीएमसी क्षेत्रातील एकमेव असा ९० फुटी रस्ता ही नव्याने ओळख असलेला हा वॉर्ड तुलनेने मोठाही आहे. नियोजनबद्ध इमारती-रस्ते या ठिकाणी तयार होत असतानाच मूलभूत गरजांसाठी मात्र या ठिकाणच्या नागरिकांना डोंबिवलीवरच अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे भाजी मंडईची प्रशस्त जागा असूनही केवळ महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे ती सुविधा मिळत नसल्याने महिलावर्गासह ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होते.
येथील मंगलकलश सोसायटीमध्ये मंडईसाठी महापालिकेची सुमारे १५०० स्क्वे. फूट ग्राउंड प्लस वन सुसज्ज जागा आहे. तेथे इमारतीचे काम पूर्ण झाले, नागरिक वास्तव्याला गेले, पाठोपाठ परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यात २४ तास पाण्याची सुविधा, डांबरीकरणाचे चांगले रस्ते आदी असले तरीही भाजी, मच्छी, किराणा या जीवनावश्यक बाबींसाठी नागरिकांना अद्यापही डोंबिवली अथवा ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात १.५ ते २ किमी जावे लागते. वॉर्डाचा बहुतांशी भाग हा एमआयडीसी क्षेत्रालगत असल्याने प्रदूषणाचीही समस्या आहेच. अनेकदा संध्याकाळच्या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणे नकोसे होते, तशा अवस्थेत वर्षानुवर्षे लोक येथे राहतात. खंबाळपाड्यातच परिवहनचा मोठा भूखंड आहे, मात्र तेथेही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बसेस उभ्या राहण्याऐवजी कचऱ्याच्या गाड्या उभ्या राहतात. असे असूनही या ठिकाणची कचरा निर्मूलनाची समस्या आहेच. लाखाच्या घरात असलेल्या वस्तीसाठी अवघे ६ सफाई कर्मचारी, तेही पूर्णपणे येत नाहीत. या ठिकाणी तीन स्मशानभूमी असून एक स्मशानभूमी अद्ययावत आहे, तर अन्य एका ठिकाणी २९ लाख खर्चून शोकसभागृह व १४ लाखांच्या लाद्या बसवण्यात येणार आहेत. सध्या तरी त्या ठिकाणी प्रचंड गैरसोय असून तो गर्दुले व तळीरामांचा अड्डा बनला आहे. तिसरी रस्त्यालगत असून त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कृत्रिम तलाव असून या ठिकाणी बहुतांशी सार्वजनिक मंडळे, घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते.
परिवहन सेवेचा लाभही येथील नागरिकांना मिळत नाही. येथूनच हाकेच्या अंतरावर पेंढरकर महाविद्यालय, मंजूनाथ कनिष्ठ महा., सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर, क्रीडा संकुल, डोंबिवलीकरांचे भूषण असलेल्या कॅ. विनयकुमार सच्चान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेला शौर्यगाथा सांगणारा ‘रणगाडा’, घरडा सर्कलचे फाउंटन आदी महत्त्वाची, विरंगुळ्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, रात्री-अपरात्री नाटक सुटल्यावर बसची सुविधा नसल्याने रिक्षा, टॅक्सी वाहने शोधताना नागरिकांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे खंबाळ पाड्यातून ठाकुर्ली - डोंबिवलीसाठी मध्यरात्रीपर्यंत परिवहनची सुविधा असणे आवश्यक आहे.

Web Title: The Mandai Vaastu only; Residents have to take Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.