सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप भक्तांविना सुने सुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:39 AM2021-09-13T04:39:37+5:302021-09-13T04:39:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारसह विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी केल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तीचे दर्शन ऑनलाइन ठेवले आहे. ज्या ठिकाणी ऑनलाइन दर्शनाची सुविधा मंडळांकडून उपलब्ध नाही, तिथे नियमावलीचे पालन करून साधारणत: तीस फुटांवरून मुखदर्शन करण्याची सुविधा आहे. कोरोना नियमावलीचे पालन करुन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे चला की राया जाऊ बघाया मुंबईचे गणपती हो हे गणेशगीत प्रसिद्ध आहे. या गीतात त्यांनी पुणे आणि कल्याणच्या गणेशोत्सवातील गणेश देखाव्यांची महती सांगितली आहे. पुणे, मुंबई पाठोपाठ कल्याणच्या गणेश देखाव्यांची ख्याती होती. गणेशोत्सवाला कार्पोरेट स्वरुप प्राप्त झालेले असले तरी जुनी मंडळे आजही देखाव्यांची परंपरा आणि शिस्तबद्ध उत्सव साजरा करताना दिसून येत आहेत. मार्च २०२० नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. मागच्या वर्षी गणेशोत्सवाला कोरोनाचा फटका बसला. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या कल्याणमध्ये वाढली होती. एकाच कुटुंबातील ३२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. आतादेखील गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढू शकते, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी सांगितले की, मंडळाचे हे ७२ वे वर्ष आहे. दरवर्षी मंडळाच्या गणपतीला ज्या पद्धतीने आरास आणि रोषणाई केली जाते, ती यंदा केलेली नाही. अत्यंत साधी आरास केवल मूर्तीच्या पार्श्वभूमीवर केली आहे. कोरोना रोखण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनानुसार ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. भक्तच नव्हे तर मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांनीसुद्धा ऑनलाइन दर्शनच घ्यावे, असे आवाहन केले आहे. मंडळाचा परिसर सॅनिटाइज केला जात आहे. मंडळाचे कार्यकर्ते मंडप परिसरात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करुनच मंडपात प्रवेश करतील, अशी सक्ती केली आहे. त्या ठिकाणी ऑक्सिमीटर, थर्मल टेपरेंचर मशीन प्रवेशद्वारावर ठेवली आहे. कार्यकर्त्यांचीही तपासणी केल्याशिवाय त्यांना मंडपात सोडले जात नाही.
कल्याणचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुभेदार वाडा हे यंदा १२७ वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. या मंडळावर चार विश्वस्त आहे. त्यापैकी मंडळाचे विश्वस्त भालचंद्र जोशी यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता त्यांनी साधेपणाने गणेशाची स्थापना केली आहे. परशुराम मंडळास त्यांनी उत्सव साजरा करण्याची जबाबदारी दिली आहे. मंडळाकडे पटांगण मोठे असल्याने त्या ठिकाणी ऑनलाइनची सुविधा नाही. मात्र दर्शनाकरिता मूर्ती आणि भक्त यांच्यातील अंतर किमान तीस फुटांचे ठेवले आहे. त्या ठिकाणी प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सक्तीचा केला आहे. अन्य मंडळांचीही परिस्थिती वेगळी नाही. ज्या ठिकाणी ऑफलाइन दर्शन आहे, त्याठिकाणी भक्तांची फारशी गर्दी नाही. दहा दिवसांच्या गणपतीची आरास पाहण्यासाठी पाच दिवसांच्या विसजर्नानंतर लोक घराबाहेर पडतात. त्यानंतर कदाचित दर्शनाला रांग लागू शकते. मात्र अनेक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या वर्गणीचा पैसा हा आरास आणि अन्य कार्यक्रमावर खर्च न करता कोरोना प्रादुर्भाव रोखणे, कोकणातील पूरग्रस्तांना मदत करणे, गरजूंना वैद्यकीय आणि शैक्षणिक कामासाठी उपलब्ध करुन देणे यावर खर्च केला जात आहे. त्यामुळे सध्या तरी सार्वजनिक गणेश आरासपेक्षा घरगुती आरास चर्चेचा विषय ठरत आहेत.
--------------------------------------------------------
फाेटाे-कल्याण-टिळकनगर डाेंबिवली