ग्रंथालयांसाठी ३0 जूनपर्यंत लॉकडाऊनची सक्ती का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 12:20 AM2020-06-08T00:20:29+5:302020-06-08T00:20:35+5:30

ठाण्यातील वाचनालयांचा सवाल : अधिकाऱ्यांना आज देणार निवेदन

Mandatory lockdown for libraries till June 30? | ग्रंथालयांसाठी ३0 जूनपर्यंत लॉकडाऊनची सक्ती का?

ग्रंथालयांसाठी ३0 जूनपर्यंत लॉकडाऊनची सक्ती का?

googlenewsNext

ठाणे : पुस्तकांची दुकाने उघडण्यात आली आहेत तर ग्रंथालय सुरू करण्यासदेखील शासनाने परवानगी द्यावी अशी एकमुखी मागणी ठाणे शहरातील ग्रंथालयांनी केली आहे. ग्रंथ दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळत असेल, तर ग्रंथालयांसाठी ३0 जूनपर्यंत लॉकडाऊन का, असा सवाल या ग्रंथालयांनी केला. ग्रंथालये सुरू करण्याची परवानगी मिळावी, यासंदर्भात सोमवारी ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्यावतीने पत्र देण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात वाचकप्रेमींनी त्यांच्याजवळ असलेली जवळपास सर्वच पुस्तके वाचली. त्यामुळे नवीन पुस्तके वाचण्यासाठी वाचक उत्सुक आहेत, असे मत ठाण्यातील काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले. त्यामुळे ग्रंथालय सुरू होण्यासाठी ३0 जूनपर्यंत वाट का पहावी असा प्रश्न वाचकांनीही उपस्थित केला आहे. ग्रंथालये ही लवकर सुरू करावी अशा मागणीचे पत्र जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने दिले जाणार आहे. ग्रंथालयात मर्यादित वाचक येतात, गर्दी होत नाही. ग्रंथालये सुरू नसल्याने वाचक पुस्तके खरेदी करीत आहेत. त्यामुळे ग्रंथालयातील वाचकांची संख्या कमी होऊ शकते, असे ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर यांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला ग्रंथालये तयार असल्याचे कळव्यातील जवाहर वाचनालयाचे सेक्रेटरी सुशांत दोडके यांनी सांगितले.
ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मुक्तद्वार वाचनालय आणि पुस्तकांची देवाण घेवाण हे तीन कक्ष आहेत. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता ग्रंथालयातील पुस्तकांची देवाण घेवाण हा विभाग सुरू करायला हरकत नाही असे ठाणेनगर वाचन मंदिराचे केदार जोशी यांनी सांगितले.

ग्रंथालये ही शैक्षणिक संस्थेंतर्गत येतात आणि शासनाने शैक्षणिक संस्था सुरू करायला परवानगी दिलेली नाही. सगळीच ग्रंथालये काळजी घेऊ शकत नाही. आमची इच्छा असली तरी धोका कोण पत्करणार? शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन ग्रंथालयांनी करावे.- प्रशांत पाटील,
जिल्हा ग्रंथालय अधिकारी

Web Title: Mandatory lockdown for libraries till June 30?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे