मांडूळाची तस्करी करणाऱ्यास ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 09:55 PM2020-12-25T21:55:38+5:302020-12-25T21:57:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील अल्मेडा चौकामध्ये एका मांडूळाची ५० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तस्लीम देशमुख (५०, रा. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील अल्मेडा चौकामध्ये एका मांडूळाची ५० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तस्लीम देशमुख (५०, रा. गुजरात) या रिक्षा चालकाला नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. त्याच्या तावडीतून या मांडूळाची सुटका करण्यात आली आहे. त्याला वनविभागाकडे सुपूर्द केल्याचे पोलिसांनी सांगितले.
नौपाडा भागातील अल्मेडा चौकातील एक व्यक्ती औषधी पदार्थ आणि काळू जादू करण्याच्या नावाखाली मांडूळाच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, उपनिरीक्षक लभडे, पोलीस नाईक सुनिल राठोड, प्रशांत निकुंभ, चडचणकर आणि कॉन्स्टेबल गोरख राठोड यांच्या पथकाने २४ डिसेंबर रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास तस्लीम या संशयिताला सापळा रचून रायगड आळी, नौपाडा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेमधून चार किलो १५ ग्रॅम वजनाचे आणि ५४ इंच लांबीच्या या मांडूळाची सुटका करण्यात आली. तो या मांडूळाची सुमारे ५५ लाखांमध्ये विक्री करणार होता, अशी कबूलीही त्याने दिली. त्याने हे मांडूळ कोणाकडून आणले? यात आणखी कोणती टोळी सक्रीय आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.