कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात अजिबात सत्ता जाणार नाही, मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 07:27 AM2023-06-01T07:27:20+5:302023-06-01T07:27:57+5:30
महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले.
ठाणे : कर्नाटक निकालाबाबत बोलले जाते; पण त्याचवेळी उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल भाजपच्या बाजूने आला. तेथे १०० टक्के निकाल आमच्या बाजूने लागूनही त्याबाबत कोणी बोलत नाही. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात सत्ताबदल होणार नसल्याचा दावा पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी केला.
महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले. याचदरम्यान ठाणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी यापूर्वी २० कोटींपेक्षा जास्त निधी दिला असून, यंदा विशेष योजना राबविण्यात येणार असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
फेरीवाला योजनेबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लोढा यांनी टीका केली. तसेच खासदार संजय राऊत यांच्याकडून केलेल्या आरोपांना उत्तर देणेही टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @ ९’ कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देण्यासाठी भाजपच्या ठाणे खोपट येथील कार्यालयात ते आले होते.
पर्यटनस्थळांसाठी आराखडा
शहरात महाजनसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यानिमित्ताने शहरातील चार लाख घरांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचून पंतप्रधान मोदींनी केलेल्या कार्याची माहिती देतील. ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन आराखडा तयार करण्यात येत आहे. सागरमाला योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील बंदरांमधून प्रवासी वाहतूक सुरू होईल, असे लोढा यांनी सांगितले. याशिवाय जागतिक दर्जाच्या रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर ठाणे स्थानकाच्या विकासासाठी मोदी सरकारने ८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.