२ ते १४ मे दरम्यान ठाणे शहरात आंबा महोत्सव; यंदा आंब्याचे २० टक्केच उत्पादन, आ. केळकर यांची खंत
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 25, 2023 03:28 PM2023-04-25T15:28:52+5:302023-04-25T15:31:45+5:30
यंदादेखील अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे अशी खंत संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
ठाणे: कोकणात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो. यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. २०२० साली ३ लाख २१ हजार मेट्रिक टन, २०२१ मध्ये २ लाख ५६ हजार मेट्रीक टन, २०२२ मध्ये १ लाख २८ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन झाले आहे. यंदादेखील अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे अशी खंत संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
दरवर्षी आंब्याचे उत्पादन घटत आहे त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी अशाप्रकारचे आंबा महोत्सव आयोजीत केला आहे. या महोत्सवात एकुण ४० स्टॉल्स असणार आहेत, यापैकी पाच स्टॉल महिला बचत गटाकरीता असतील असे आ. केळकर यांनी सांगितले. आंबा महोत्सव यावर्षी देखील ठाण्यामध्ये रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच, संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने २ मे ते १४ मे या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वाजे पर्यंत गावदेवी मैदान येछे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे यंदाचे हे १६ वे वर्ष आहे. या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची थेट भेट होऊन लाखोंची उलाढाल होत असते.
यात शेतकऱ्यांना फायदा होतोच शिवाय, ग्राहकांनाही कोकणातील अस्सल हापूस आंबा योग्य दरात मिळतो. गावदेवी मैदानात आंबा महोत्सवात प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध ठेवल्याचे आमदार संजय केळकर यानी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर,ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे, संतोष साळुंखे आदी उपस्थित होते.