ठाण्यात १ ते १० मे दरम्यान आंबा महोत्सव
By admin | Published: April 24, 2016 02:10 AM2016-04-24T02:10:56+5:302016-04-24T02:10:56+5:30
यंदा आंब्याचे पीक जरी कमी असले तरी कोकणातील चांगल्या दर्जाच्या आंब्याची चव ठाणेकरांना चाखता यावी, या उद्देशाने यंदाही संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे १ ते १० मे दरम्यान
ठाणे : यंदा आंब्याचे पीक जरी कमी असले तरी कोकणातील चांगल्या दर्जाच्या आंब्याची चव ठाणेकरांना चाखता यावी, या उद्देशाने यंदाही संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे १ ते १० मे दरम्यान गावदेवी मैदान, ठाणे येथे आंबा महोत्सव भरविण्यात येणार आहे.
अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी आणि थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात आहेत. यंदा २५ टक्के पीक हाती येणार आहे. २०१३ मध्ये २८ लाख २० हजार मेट्रिक टन इतके आंब्याचे उत्पादन होते. या वर्षी ते केवळ १ लाख २८ हजार मेट्रिक इतके झाले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचता येणार असून थेट विक्रीतून मिळणारा पूर्ण फायदाही त्यांना मिळणार आहे, असे संस्कारचे अध्यक्ष आणि आमदार संजय केळकर यांनी सांगितले. हे या महोत्सवाचे ११ वे वर्ष असून १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दहाही दिवस हा महोत्सव सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू राहणार आहे. महोत्सवात देवगड, रत्नागिरी, चिपळूण, खेड येथील हापूस व पायरी आंब्यांबरोबरच कोकणातील विविध खाद्यपदार्थ, मसाले, पापड यांचे स्टॉलही असणार आहेत. तर, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आंब्यांच्या प्रजातींची माहिती देणारा स्टॉलही असेल, असेही केळकर म्हणाले. या वेळी प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठाणे पालिकेचे स्थायी समिती सभापती संजय वाघुले उपस्थित होते.