भाईंदरमध्ये रक्षाबंधन निमित्त कांदळवन स्वच्छता मोहिम; राखी बांधून निसर्ग रक्षणाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:01 PM2021-08-22T16:01:43+5:302021-08-22T16:02:50+5:30
कांदळवनला राखी बांधून कांदळवनचे संरक्षण करण्याचा संकल्प पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला
मीरारोड - रक्षाबंधन निमित्त भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क खाडी किनारी कांदळवन मधील कचरा, डेब्रिस काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी कांदळवनला राखी बांधून कांदळवनचे संरक्षण करण्याचा संकल्प पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला.
आज रविवारी सकाळी आरएनपी पार्क खाडी किनारी कांदळवन परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. शासनाच्या कांदळवन विभागासह फॉर फ्युचर इंडिया, खेलो मिरा भाईंदर खेलो, मॅन्ग्रोव्ह फॉउंडेशन, चाईल्ड हेल्प फॉउंडेशन संस्था, भाईंदर पश्चिम येथील व्हिन्सेंट डी-पॉल हायस्कूलचे विद्यार्थी, महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच स्थानिक रहिवासी स्वछता मोहिमेत सहभागी झाले होते.
कांदळवन मध्ये बेकायदा टाकलेले मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक, कचरा, जुने फर्निचर , डेब्रिस, जाळी आदी काढण्यात आले. तसेच परिसरात नव्याने कचरा - डेब्रिस टाकले जाणार नाही या साठी उपाययोजना व कारवाईची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. कारण या परिसरात सातत्याने कांदळवन कचरा - डेब्रिस टाकून तसेच बेकायदा बांधकामे करून नष्ट केले जात आहे.
येथील कांदळवन मधील महापालिकेची व खाजगी लोकांची बेकायदा बांधकामे तोडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वन विभागाच्या वतीने कांदळवन चे महत्व, कायदेशीर बाबी आदी बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्थानिक महिला - मुलींसह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी कांदळवनास राखी बांधुन कांदळवनाचे रक्षण करण्याचा संकल्प केला. प्रामुख्याने महापालिका, पोलीस व नगरसेवकांनी कांदळवन क्षेत्रात डेब्रिस, कचरा, दगड मातीचा भराव तसेच बेकायदेशीर बांधकामे केली जाणार नाहीत याची जबाबदारी उचलली पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.