कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात हेराफेरी
By admin | Published: October 27, 2015 12:06 AM2015-10-27T00:06:13+5:302015-10-27T00:06:13+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही.
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. तसेच भविष्य निर्वाह निधी आणि अन्य सुविधाही देण्यात येत नसल्यामुळे या कामगारांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. ज्या संघटनेकडे या कामगारांचे नेतृत्व आहे. ती संघटनादेखील कामगारांचे प्रश्न हाताळण्याबाबत कुचकामी ठरली आहे.
महानगरपालिकेमध्ये ८५ टक्के कर्मचारी ठेक्यावर असून त्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून वेतन दिले जाते. काही वर्षांपूर्वी वेतन देण्याबाबत ठेकेदार दिरंगाई करत असल्याचे लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेने त्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांची बँक खाती उघडली, परंतु त्यांचे एटीएम कार्ड मात्र स्वत:कडे ठेवले. मध्यंतरी, नालासोपारा येथील स्मशानभूमीत काम करणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन दिले नाही. हे प्रकरण उपायुक्त डॉ. अजीज शेख यांच्या कानांवर टाकल्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदाराला कानपिचक्या दिल्या आणि या ठेकेदाराने ९ पैकी ६ कर्मचाऱ्यांना वेतन दिले तर उर्वरित ३ कर्मचाऱ्यांना अद्याप ताटकळत ठेवले आहे. राज्य शासनाने पदमंजुरी दिल्यामुळे महानगरपालिकेतील पदे त्वरित भरावीत, अशी मागणी जोर धरत असतानाच ठेकेदारांवर आयुक्त सतीश लोखंडे यांनी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
आपल्याला नोकरी गमवावी लागेल, या भीतीने ठेक्यावरील कामगारांच्या त्रासासंदर्भात कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे आयुक्तांनी पुढाकार घेऊन गैरप्रकार करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. वेतनामध्ये हेराफेरी करणाऱ्या ठेकेदारांवर त्यांनी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली आहे.