मांजर्ली, हेंद्रे्रपाड्याला बसला सर्वाधिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:52 AM2019-07-29T00:52:23+5:302019-07-29T00:52:53+5:30
प्रशासनाकडून वेळेत मदत नाही : १४ वर्षांनंतर पुराचा अनुभव, घरांमधील अनेक वस्तूंचे नुकसान
बदलापूर : महापुरात बदलापूरमधील हेंद्रेपाडा आणि मांजर्ली भागातील नव्या वस्तीला सर्वाधिक फटका बसला आहे. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर पुन्हा १४ वर्षांनी बदलापूरकरांनी २७ जुलै २०१९ च्या पुराचा अनुभव घेतला. मात्र पूर्वीपेक्षा बदलापूरमध्ये नदीपात्राजवळ सर्वाधिक इमारती झाल्याने त्याच इमारतींना सर्वात मोठा फटका बसला आहे. बॅरेज रस्त्यावरील रितू वल्ड या संकुलातील पहिला मजलाही पाण्याखाली आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तर मदतीच्या नावावर प्रशासनाने रस्ते बंद करण्यापलिकडे कोणतेच काम केले नाही. प्रशानाकडून वेळेत मदत न आल्याने नागरिकांनी स्वत:ची सोय स्वत:च केली होती.
शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शनिवारी पहाटे बदलापूरमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. दिवसभर पावसाचा कहर सुरू राहिल्याने शनिवारचा दिवस नागरिकांनी इमारतीवरील वरच्या मजल्यावर काढला. रात्री ८ नंतर पाण्याची पातळी कमी झाल्यावर नागरिकांनी पुन्हा आपल्या घराचा ताबा घेतला. मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामान हे पाण्यात भिजले होते. अनेकांच्या महागड्या वस्तू या पुरात नादुरुस्त झाल्या. पाण्यासोबत चिखलही मोठ्या प्रमाणात आल्याने संपूर्ण घरात चिखल झाला होता. त्यातच पाणी आणि वीजपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांना आपल्या घरातील गाळ काढण्यातही अडचणी आल्या.
शनिवारचा दिवस आणि शनिवारची रात्र अंधारात काढल्यावर रविवारी प्रत्येकाने घराची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले. पालिकेची यंत्रणा ही केवळ बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने नागरिकांनी आपल्याच इमारतीमधील सहकाऱ्यांची मदत घेत घराची स्वच्छता केली.
शहरातील पाणी पुरवठा बंद राहिल्याने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी टँकरची मदत घेण्यात आली. पुरात बाधित झालेल्या परिसरात टँकरनेच दिवसभर पाणीपुरवठा करण्यात आला. तर सकाळी वीजपुरवठाही सुरळीत झाल्याने नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. ज्या घरांमध्ये पाणी शिरले होते त्या घरांची अवस्था बिकट झाली होती. घरातील धान्य आणि वापरातील सर्व साहित्यही पाण्यात भिजले होते. याच भागातील दुकानदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुकानातील सर्व साहित्य भिजल्याने दुकानदारांनी शिल्लक राहिलेल्या सामानाची आवराआवर करण्यात दिवस घालवला.
वालीवली भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने त्या घरातील नागरिकांच्या वस्तुंचे नुकसान झाले. टीव्ही, फ्रीज, एसी नादुरूस्त झाले. विद्यार्थ्यांची पुस्तकेही पाण्यात भिजल्याने शैक्षणिक नुकसान झाले. हेंद्रे्रपाडा भागातील अनेक प्राण्यांना देखील पुराचा फटका सहन करावा लागला. नागरिकांनी शक्य झाले तेथे प्राण्यांची मदत करुन त्यांना वाचविण्याचे काम केले.
रस्तेवाहतुकीसाठी खुले
शनिवारी दिवसभर हेंद्रेपाडा, रमेशवाडी, बॅरेज रोड आणि वालिवली भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्यावर रविवारी सकाळी हे सर्व मार्ग पुन्हा खुले करण्यात आले. त्यामुळे स्टेशन परिसरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत झाली.
बालकाश्रमालाही फटका
सत्कर्म बालकाश्रमालाही या पुराचा फटका सहन करावा लागला. या ठिकाणी असलेली २५ मुले सुखरुप असली तरी त्यांचे नियमित वापराच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना घालण्यासाठी कपडेही शिल्लक राहिले नाही.
सामाजिक संस्थांची मदत
रमेशवाडी भागात पुराचा सर्वात जास्त फटका बसल्याने या भागातील नागरिकांना मदतीसाठी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी पुढे सरसावले. तर राजकीय पुढाºयांनीही या भागात खाद्यपदार्थ, जेवण आणि दैनंदिन वापराचे साहित्य पुरवठा केला.