भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
By नितीन पंडित | Published: September 13, 2022 05:34 PM2022-09-13T17:34:47+5:302022-09-13T17:35:18+5:30
भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.
भिवंडी : भिवंडीतील माणकोली अंजुरफाटा ते चिंचोटी या महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर मालोडी येथील टोल नाक्यावर अवजड वाहनांवरून मोठ्या प्रमाणात टोल वसुली होत असतांनाही मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र या दुरावस्थेकडे टोल कंपनीसह भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व रस्त्याची देखभाल दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करीत आहेत.
मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी हा महामार्ग सुमारे २८ किलोमीटरचा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात गोदामपट्टा असल्याने वसई विरार ते अहमदाबाद गुजरात पासून ते पुढच्या राज्यातील अवजड वाहने आपल्या मालाची ने आण याच रस्त्याने करतात त्यामुळे य मार्गावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच या अवजड वाहनांकडून मालोडी येथील टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात टोल वसुली करण्यात येते. मात्र रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे कोणतेही लक्ष या टोल कंपनीचे नसल्याने व या कंपनीवर भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणताही वचक नसल्याने हा रस्ता प्रचंड नादुरुस्त झाला आहे.
बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
या रस्त्यावर मानकोली, वळगाव, अंजुरफाटा, बहात्तर गाळा ,कालवार, वडघर, खारबाव मालोडी ते पुढे कामण चिंचोटी पर्यंत या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या मार्गावर अपघातांचे सत्र देखील मोठ्या प्रमाणात सुरु असते. या रस्त्यावर एखाद्या वाहनाचा जेव्हा एखादा अपघात होतो त्या वेळेस टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्ता दुरुस्तीचा कांगावा करत असतात. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस उपाय योजना राबवत नसल्याने हा मार्ग देखील मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बनविलेल्या रस्त्याची त्रयस्थ यंत्रणेकडून पाहणी करण्यात यावी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच स्थानिक नागरिकांकडून होत आहे.