भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची चाळण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 05:17 PM2020-08-06T17:17:11+5:302020-08-06T17:17:22+5:30
हा महामार्ग चिंचोटी येथे मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडत असून मानकोली येथे मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जातो.
नितीन पंडित
भिवंडी- भिवंडीतील मानकोली चिंचोटी महामार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अंजुरफाटा ते खारबावपर्यंत या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवितांना वाहन चालकांना अनेक अडचणी येत आहेत . विशेष म्हणजे हा रस्ता बीओटी तत्वावर देण्यात आला असून सुप्रीम कंपनीतर्फे सध्या या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व टोल वसुली करण्यात येत आहे. हा महामार्ग चिंचोटी येथे मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडत असून मानकोली येथे मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जातो.
तसेच भिवंडीत या मार्गावर गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात विकसित झाला असल्याने या चिंचोटी मानकोली महामार्गावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ सुरु असते. या माध्यमातून टोल कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असतो मात्र आर्थिक फायदा होऊनही टोल वासून करणाऱ्या सुप्रीम कंपनीचे रस्त्याच्याया देखभाल दुरुस्तीकडे पुरता दुर्लक्ष होत आहे.
या रस्त्यावर नेहमीच मोठमोठे खड्डे असल्याने या महामार्गावर नेहमीच अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र या रस्त्याची देखभाल करणाऱ्या सुप्रीम कंपनी त्यासंदर्भात काहीच देणं घेणं नसून केवळ आर्थिक नफा मिळविणे हे एकमेव उद्देश या टोल वसूल करणाऱ्या कंपनीने ठेवले आहे. विशेष म्हणजे राजकीय वरदहस्तामुळे सुप्रीम कंपनी स्थानिकांच्या गंभीर समस्येकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुचनांकडे नेहमीच दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश शासनाने त्वरित सुप्रीम कंपनीला द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.