माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका अखेर झाली खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:41 AM2020-09-23T00:41:46+5:302020-09-23T00:41:56+5:30

वाहनचालकांना दिलासा : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कार्यवाही

The Mankoli flyover was finally opened | माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका अखेर झाली खुली

माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका अखेर झाली खुली

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर एमएमआरडीएने या मार्गावरील वाहतूक सोमवारपासून सुरूकेली. भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाची औपचारिकता टाळल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेने डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आॅनलाइन होणार होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्या आॅनलाइन उपस्थितीत सोमवारी दुपारी १.३० वाजता हे लोकार्पण ठरले होते. त्याप्रमाणे एमएमआरडीएने आवश्यक ती तयारीही केली होती. मात्र, पहाटे भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी भिवंडी येथे धाव घेतली. मदतकार्य वेगाने सुरू झाले. त्यानंतर हा लोकार्पणाचा कार्यक्र म रद्द करण्यात आला.
परंतु, केवळ अधिकृत उद्घाटन झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटनाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करून वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमएमआरडीएचे
सहआयुक्त बी. जी. पवार यांनी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेला तसे आदेश दिल्यानंतर ही मार्गिका वाहतूक शाखेने सोमवारपासून अधिकृतरीत्या सुरू केली.
दरम्यान, २०१९ मध्ये या आठ पदरी उड्डाणपुलाच्या विरुद्ध बाजूच्या चार पदरी मार्गिकेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाइनच उद्घाटन केले होते. आता दुसऱ्या बाजूचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, उद्घाटनाऐवजी ही मार्गिका थेट सुरू केली आहे.


२०१३ मध्ये या आठ पदरी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले. त्यापैकी एक बाजू २०१९ मध्ये सुरू झाली तर दुसरी बाजू आता सुरू करण्यात आली. मुंबई-नाशिक मार्गावरील वाहनधारकांची दोन्ही बाजूंनी २० ते २५ मिनिटांची बचत होणार आहे. शिवाय, वाहतूककोंडीही आता फुटणार आहे.
- बी. जी. पवार,
सहआयुक्त, एमएमआरडीए, मुंबई

 

Web Title: The Mankoli flyover was finally opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.