लघुशंकेसाठी एक्स्प्रेसमध्ये चढला आणि पोहोचला कल्याणला; पोलिसांमुळे गुलाबवाडीचा मनोज परतला घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 09:08 AM2022-03-23T09:08:23+5:302022-03-23T09:08:33+5:30
त्रोटक माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांमध्येच त्याच्या पालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश
ठाणे : आपल्या मित्रांसमवेत खेळताना केवळ लघुशंकेसाठी एक्स्प्रेसमध्ये चढलेल्या नाशिकच्या गुलाबवाडीतील नऊ वर्षीय मनोज हा ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटमुळे सुखरूप स्वगृही परतला आहे. त्रोटक माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांमध्येच त्याच्या पालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी मंगळवारी दिली.
उल्हासनगर येथील शासकीय मुलांच्या बालसुधारगृहाला ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने २१ मार्च रोजी सकाळी भेट दिली. तेव्हा २० मार्च रोजी नऊ वर्षीय मनोज नामक मुलगा आपल्या संस्थेत दाखल झाला असून तो नाशिक येथे वास्तव्याला आहे. तसेच त्याला पूर्ण पत्ता सांगता येत नसल्याची माहिती या बालसुधारगृहाचे समुपदेशक तथा प्रभारी अधिकारी संतोष खोपडे यांनी दिली. त्यानुसार या युनिटच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हितगुज करून त्याचा विश्वास संपादन केला. तो वास्तव्याला असलेल्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय तसेच अण्णाचे दुकान इतकीच त्रोटक माहिती त्याने दिली. तो नाशिकच्या गुलाबवाडी भागात वास्तव्याला असल्याचीही माहिती समोर आली.
मनोज शंकर जाधव असे आपले पूर्ण नाव त्याने सांगितले. त्याचआधारे नाशिक रोड पोलीस ठाण्यांतर्गत हा गुलाबवाडीचा भाग येताे. याच भागातून ताे बेपत्ता झाला असून त्याचे वडील शंकर जाधव यांचे निधन झाल्याचेही चौकशीत या पथकाला समजले. त्याची आई कल्पना जाधव यांचा मोबाईल क्रमांक मिळवून पोलीस हवालदार चौधरी यांनी त्यांच्या मोबाईलद्वारे व्हिडीओ कॉल करून मनोज आणि त्याच्या आईशी बातचीत करून दिली. दोघांनी एकमेकांची ओळख पटविल्यानंतर गुलाबवाडीतील हा पत्ताही शोधून त्याला बालकल्याण समितीच्या मदतीने आईच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.