एकाचा विरोध म्हणून ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका; मनोज जरांगेंनी थेट सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 02:05 PM2023-11-21T14:05:16+5:302023-11-21T14:05:50+5:30

गुन्हे केल्यामुळे मराठा समाज घाबरणार नाही आणि खचणारही नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. 

Manoj Jarange Patil criticizes government over Maratha reservation, warns Chhagan Bhujbal too | एकाचा विरोध म्हणून ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका; मनोज जरांगेंनी थेट सुनावलं

एकाचा विरोध म्हणून ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका; मनोज जरांगेंनी थेट सुनावलं

ठाणे - आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही लढतोय. तुम्ही ठरल्याप्रमाणे करायला तयार नाही. एक माणूस विरोध करतो म्हणून तुम्ही ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू शकत नाही.आपण कुणाचे नाव घेत नाही. लायकीही नाही. आधी विचार म्हणून विरोध होता. वैचारिक मतभेद असले पाहिजे. पण ज्यादिवशी ते कायद्याच्या घटनेच्या पदावर असताना जातीय तेढ निर्माण केला. तेव्हापासून त्या व्यक्तिलाही मराठ्यांचा विरोध आहे अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही तुम्हाला महत्त्व देत नाही. तुम्ही पातळी सोडून बोलला. तुम्ही मराठा आरक्षण देऊ नका बोलला त्यामुळे तुमचा विषय मराठ्यांच्या नजरेतून संपला. तुम्ही कितीही विरोध केला. कितीही कार्यक्रम घेतले तोच मराठ्यांचा फायदा होतोय. आमचे सगळे मराठे एकत्र झालेत. एका सभेने मराठा एकत्र झाले. इतका अनुभव असून काय फायदा, मी रानातला माणूस बरा. कुणाच्या हाताला लागत नाही. प्रशासकीय, शासकीय अनुभव, ३०-३२ वर्ष सत्ता भोगली त्या माणसाने अशी विधाने करावीत. म्हातारपणाला पचत नाही. पाणी टंचाई असली तरी जावे लागते. लोकांचे खाल्ल्यावर पचणार कसे? त्यांनी थोडे शांत राहावे नाहीतर कायम बाथरूममध्ये बसावे लागेल असा इशारा नाव न घेता भुजबळांना दिला. 

तसेच स्वत:च्या समाजाला बकरं म्हणून हिणवायचे, २-४ जण बाहेर निघाले. माणसं चालली उरका पटपट असं सभेत बोलायला लागली. सध्या मराठ्यांची त्सुनामी आलीय. आमच्यामध्ये कुणी येऊ नये. हा सर्वसामान्यांचा लढा असून तो यशस्वी होणार आहे. हा माझा किंवा तुमचा नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विजय होणार आहे. २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करा. कारण आमच्या नोंदी सापडल्या, तुम्ही नाकारू शकत नाही. ओबीसीच्या एका नेत्यासमोर एकच पर्याय आहे.बाकींना ओढले जातंय.मराठा आता ओबीसी आरक्षणात आले, मग आता एकच जातीय भांडणे लावणे. परंतु मराठा-ओबीसी एकमेकांसोबत राहतायेत. इतकं प्रेम आणि मित्रत्व आहे. अडीअडचणीला एकमेकांसोबत उभे राहतात. नांगराला बैल लागले तरी एकमेकांना देतात. ही ग्रामीण भागात चर्चा आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्यांना प्रमाणपत्रे दिले पाहिजे आणि आपल्या नेत्यांनी गप्प राहिले पाहिजे अशी ओबीसी समाजातील भावना आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, आमच्यावर अन्याय झालाय आणखी किती दिवस सहन करणार? आमच्या लेकरांचे करिअर उद्ध्वस्त केले. २० दिवस झाले मी एकही शब्द त्यांच्यावर बोललो नाही. पोलीस प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करतायेत. कायदा सुव्यवस्था बिघडावी असं सरकारला वाटतंय का? हा प्रश्न माझा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. तुम्हीच ठरवून त्यांना पुढे केलंय का? मराठा-ओबीसीत वाद नको म्हणून दिवस रात्र आम्ही लोकांच्या दारात जातोय. तुम्ही त्यांना पाठबळ देऊ लागलात. तुम्हाला जातीजातीत तेढ निर्माण करून सरकारलाच दंगली भडकावून आणायच्या आहेत असा अर्थ आहे का? लोकांना शांततेत राहा असं आम्ही सांगतोय. तुम्ही दंगलीची भाषा करताय. राजकीय स्वार्थापोटी राज्यात दंगली होऊ द्यायच्या नाहीत. ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले त्यांच्यावरच गुन्हे नोंद करायला लागलेत. आम्ही थांबणार नाही. गुन्हे केल्यामुळे मराठा समाज घाबरणार नाही आणि खचणारही नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. 
 

Web Title: Manoj Jarange Patil criticizes government over Maratha reservation, warns Chhagan Bhujbal too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.