ठाण्यात रंगली एकपात्री अभिनय स्पर्धा, मानसी जाधव प्रथम
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 25, 2023 04:08 PM2023-12-25T16:08:51+5:302023-12-25T16:09:42+5:30
आनंद विश्व गुरुकुल, ठाणे विद्यमाने मोरया - ईवेंट्स अँड एंटरटेनमेंट आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली.
प्रज्ञा म्हात्रे,ठाणे : आनंद विश्व गुरुकुल, ठाणे विद्यमाने मोरया - ईवेंट्स अँड एंटरटेनमेंट आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. ज्या स्पर्धेत मानसी जाधव प्रथम क्रमांक मिळवून विजयी झाले. मिथिला गायतोंडे द्वितीय तर स्मितल चव्हाण तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अभिनेते योगेश केळकर, परीक्षक विनोद गायकर,.विनोद जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. मुंबई, पुणे, बार्शी, छत्रपती संभाजी नगर, दापोली, पालघर, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी अशा विविध ठिकाणाहून स्पर्धकांनी उपस्थिती दर्शवली होती. विविध रंगी, विविध ढंगी पात्र साकारत स्पर्धकांनी आपली अभिनय कला सादर केली. स्पर्धेचे परीक्षक लेखक, अभिनेता विनोद गायकर आणि लेखक, अभिनेता विनोद जाधव यांनी स्पर्धेच परीक्षण केलं.. अक्षता साळवी, प्रथमेश देवखुळे, केतकी पांडे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते सुनील गोडसे उपस्थित होते. अशा प्रकारच्या स्पर्धा जास्त प्रमाणात होत राहिल्या पाहिजेत आणि त्यातून जास्तीत जास्त तरुण वर्ग हा नाटकाशी जोडला गेला पाहिजे असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
अभिनय करताना आवाज, शब्दफेक, भूमिका या सगळ्यांचा सारासार विचार करावा असा एक उपयुक्त सल्ला गोडसे यांनी देखील दिला. स्पर्धेची सांगता करताना संस्थाप्रमुख प्रफुल्ल गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी दोन महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात आल्या. स्पर्धेत सहभागी कलाकारांना टीम मोरयाच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल असे संस्था प्रमुख गायकवाड ह्यांच्या तर्फे आश्वासन देण्यात आले. आणि त्यासोबतच २०२४ मध्ये फेब्रुवारी महिन्यात लहान वयोगटासाठी देखील एकपात्री स्पर्धा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.