Mansukh Hiran Murder case: दमण येथून जप्त केलेल्या मोटारीमध्ये मिळाल्या दोन बॅगा
By जितेंद्र कालेकर | Published: March 23, 2021 09:02 PM2021-03-23T21:02:20+5:302021-03-23T22:10:35+5:30
ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक व्होल्वो मोटारकार सोमवारी दमण येथून जप्त केली. ही कार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे वापरत असल्याचा संशय असून तिची मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक व्होल्वो मोटारकार सोमवारी दमण येथून जप्त केली. ही कार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे वापरत असल्याचा संशय असून तिची मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. या कारची मालकी किंवा सध्या ती कोण वापरते? याची कोणतीही माहिती एटीएसकडून देण्यात न आल्यामुळे याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.
राष्टÑीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या मोटारकार प्रकरणी अटक केलेले मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या वापरातील पाच वेगवेगळया मोटारकार आतापर्यंत जप्त केल्या आहेत. या प्रत्येक कारचा नेमकी वापर कशासाठी झाला? त्याचा मनसुख हत्येशी नेमका काय संबंध आहे? याचा तपासही एनआयएकडून सध्या सुरु आहे. त्यातच एटीएसचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने ठाण्यातून विनायक शिंदे या निलंबित पोलिसाला आणि नरेश गोर या क्रिकेट बुकीला अटक केली. त्यांच्याच अटकेनंतर रोज या प्रकरणात नविन नविन माहिती समोर येत आहे. चौकशीमध्ये दमण येथून या पथकाने एक व्होल्वो मोटारकार जप्त केली. मंगळवारी एटीएसच्या ठाणे कार्यालयाच्या आवारामध्ये मुंबईच्या न्यायवैद्यक विभागाच्या पथकासह एटीएसच्या पथकांनी या मोटारीची तपासणी केली.
या मोटारीमध्ये दोन बॅगा मिळाल्या असून त्यामध्ये मोबाईल चार्जर, एक मास्क, शर्ट- पॅन्टचे तीन जोड , टॉवेल, स्टेपनीचा एक टायर आणि काही वस्तू मिळाल्या आहेत. या प्रत्येक वस्तूंवर कोणाचे ठसे मिळतात का? हे कपडे सचिन वाझे यांचे आहेत की अन्य कोणाचे आहेत? याचाही तपास केला जात आहे.
.................................
जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची?
एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो मोटारकार ताब्यात घेतली आहे, ती बांधकाम व्यावसायिक मनिष भतिजा यांच्या ‘पॅराडाईज सुपरस्ट्रक्चरर्स’ कंपनीची असल्याची कल्याणच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंद आहे. तिची १८ सप्टेंबर २०१७ रोजी फॉर्म क्रमांक २४ मध्ये आरटीओकडे नोंदणी आहे. मनिष यांचे भाजप नेत्यांशी लागेबांधे असल्याचेही बोलले जाते. मनिष यांच्या पॅराडाइज ग्रुपला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळा नजीकची (१७६७ कोटींची ) २४ एकर जमिन अवघ्या ३.६ कोटी रुपयांना विकण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.
हिरेन प्रकरणातही या मोटार कारची एन्ट्री झाली असली तरी सध्या ही मोटारकार नेमकी कोणाची आणि तिची मालकी कोणाकडे आहे? याबाबत अधिकृत भाष्य करण्यास एटीएसने नकार दिला आहे.
‘‘ ही मोटारकार आम्ही ‘पॅराडाईज सुपरस्ट्रक्चरर्स’ कंपनीला २०१७ मध्ये ७१ लाख ९७ हजारांमध्ये विकली आहे. कंपनीच्या लेखाअधिकाऱ्याशी हा व्यवहार झाला होता. त्यामुळे मालकाशी बोलणे झाले नाही. पुढे त्याबाबतचे तपशील किंवा माहिती नाही.’’
दिनेश शिवलकर, मोटारकार विक्रेते, घणसोली, नवी मुंबई