मनसुख हिरेन प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांतूनच समजले, मोहिनी वाझेंनी ‘लोकमत’जवळ सोडले मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:47+5:302021-03-15T04:24:58+5:30
ठाण्यातील ‘क्लासिक मोटार डेकोर’ या मोटारींच्या असेसरीजची (सुट्या भागांची) विक्री करणाऱ्या दुकानाचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर भागात संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर हिरेन कुटुंबीयांकडून सातत्याने सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
जितेंद्र कालेकर -
ठाणे : ‘मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात काय संबंध होते किंवा नव्हते, याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. हे संपूर्ण प्रकरण प्रसारमाध्यमांमधूनच समजले’, अशी प्रतिक्रिया सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या ताब्यात असलेले मुंबईच्या विशेष शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या पत्नी मोहिनी वाझे आणि बहीण अनुराधा हाटकर यांनी ‘लोकमत’जवळ रविवारी व्यक्त केली. (The Mansukh Hiren case was understood by the media said Mohini Vaze)
ठाण्यातील ‘क्लासिक मोटार डेकोर’ या मोटारींच्या असेसरीजची (सुट्या भागांची) विक्री करणाऱ्या दुकानाचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर भागात संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर हिरेन कुटुंबीयांकडून सातत्याने सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्याआधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या कारप्रकरणातही सातत्याने वाझे यांचे नाव समोर येत आहे. याच प्रकरणात सध्या त्यांना एनआयएने अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर वाझे यांच्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समधील निवासस्थानी प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली. त्यावेळी आम्हाला या प्रकरणाबद्दल काहीच बोलायचे नाही, अशी सावध प्रतिक्रिया त्यांची पत्नी मोहिनी यांनी दिली.
पुणे येथून आलेली सचिन यांची बहीण अनुराधा हाटकर यांनीही हे प्रकरण वादग्रस्त आणि संवेदनशील असल्यामुळे भाष्य करणे योग्य नसल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात वास्तव्याला असलेले वाझे सध्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपी असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेपासून अचानक प्रकाशझोतात आले. सुमारे ६३ नामचीन गुंडांना चकमकीत मारल्यामुळे याआधीही त्यांची मुंबई आणि ठाणे पोलीस दलात ख्याती होती; परंतु मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनूस प्रकरणामुळे त्यांच्या वर्दीला आणि प्रतिमेला डाग लागला होता.
सचिन वाझे यांच्याबाबत परिसरात चौकशी केली असता, ते चांगल्या स्वभावाचे असून, सोसायटीमध्ये त्यांचे कोणाशीही काहीच वाद नाहीत. मात्र, मनसुख हिरेन किंवा मुंबईत ॲंटिलिया इमारतीजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या मोटारकार प्रकरणावर आपल्याला काहीच बोलायचे नसून हा वादग्रस्त विषय असल्याचे साकेत कॉम्प्लेक्स सोसायटीचे सचिव गौतम मुझुमदार यांनी सांगितले.
सचिन वाझे यांना आपण ओळखत नसून, त्यांचा आपला फारसा संबंध आलेला नसल्याचे या सोसायटीमध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरक्षारक्षकाचे काम करणारे शिवप्रसाद पाल यांनी सांगितले. कळवा खाडीलगत असलेल्या साकेत सोसायटीमधील इतरही रहिवाशांनी या वादग्रस्त प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
संपूर्ण प्रकरणच अनाकलनीय !
- अलीकडेच पुन्हा मुंबई पोलीस सेवेत आल्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणामध्ये ते अडचणीत सापडले आहेत. सध्या प्रसारमाध्यमांमधूनच आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळते, असे मोहिनी सांगत होत्या.
- एकूणच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, स्फोटकांची कार आणि त्यातून एटीएस आणि एनआयएकडून सुरू असलेली पतीची चौकशी हे सर्वच प्रकरण अनाकलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
- परदेशी ब्रीडचा एक श्वानही त्यांच्या घरात कुटुंबावर आणि आलेल्या अनाहूत पाहुण्यांवर बारकाईने नजर ठेवून होता. घरातील ‘बर्फी’ नावाच्या पाळीव मांजरीशी अधूनमधून संवाद साधत आपल्यावरील ताण कमी करण्याचा त्या प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट जाणवले.
सुरक्षारक्षकानेही दिली सावध प्रतिक्रिया
मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणाचा सविस्तर तपास केला जात आहे. दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून ते राहत असलेल्यया इमारतीत सुरक्षारक्षकाचे काम करणारे शिवप्रसाद पाल यांना विचारले असता त्यांनी सावध पवित्रा घेत त्यांच्याशी फारसा संबंध आलेला नसल्याचे सांगितले.