Mansukh Hiren: मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे; मृत्यूचं कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 03:14 PM2021-03-06T15:14:17+5:302021-03-06T15:14:55+5:30
Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल ठाणे पोलिसांकडे सुपूर्द
ठाणे: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह काल मुंब्य्रात सापडला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर ठाणे पोलिसांना हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे.
कोणी कोणी त्रास दिला?; मनसुख यांनी मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख हिरेन यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा अहवाल ठाणे पोलिसांना मिळाला आहे. हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे. हिरेन यांचा व्हिसेरा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे. हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानं त्यांचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेतील, असं पोलिसांनी सांगितलं.
सर्व महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडेच कशा? सचिन वाझे भाजपपाठोपाठ मनसेच्याही रडारवर
मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी मनसुख यांच्या मालकीची असल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. आपण पीडित असूनही पोलिसांकडून एखाद्या आरोपीप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला होता. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पाठवलं होतं.
मनसुख यांनी लिहिलेल्या पत्रात संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. या पत्रात विक्रोळी पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे, एनआयए, घाटकोपर पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका पत्रकाराच्या नावाचा उल्लेख आहे. १७ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता ठाण्याहून मुंबईला येत असताना स्कॉर्पिओ (MH 02 AY 2815) या गाडीमध्ये बिघाड झाल्यानं ती ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नाहूर उड्डाणपुलाजवळ पार्क केली असं मनसुख यांनी पत्रात म्हटलं आहे. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ वाजता गाडी पार्क केलेल्या ठिकाणी मेकॅनिकसह पोहोचलो असता स्कॉर्पिओ तिथं आढळून आली नाही. त्यामुळे विक्रोळी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे विधानसभेत पडसाद; विरोधक आक्रमक
स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडल्यानं हिरेन यांची चौकशी
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मनसुख पुढे म्हणतात, २५ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता एटीएसचे २-३ पोलीस माझ्या घरी आले. तुमची स्कॉर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक भरलेल्या अवस्थेत सापडल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे मला धक्काच बसला. एटीएसच्या पोलिसांनी चौकशी केली आणि ते निघून गेले. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याचे ४-५ पोलीस रात्री पावणे अकराच्या सुमारास घरी आले आणि चौकशी करुन निघून गेले. त्यानंतर २६ फेब्रुवारीला मध्यरात्री २ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि मला घेऊन गेले. सकाळी ६ पर्यंत त्यांनी मला ताब्यात ठेवलं आणि त्यानंतर घरी सोडलं.
मनसुख हिरेन यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा?; मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
चौकशीमुळे मानसिक स्वास्थ बिघडल्याचा दावा
मनसुख हिरेन तक्रारीत पुढे म्हणतात, २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातून ३ वाजता फोन आला. १ मार्चला संध्याकाळी ४ वाजता नागपाडा एटीएसमधून फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली. पोलीस सहआयुक्त भाम्रे यांनी चौकशी केली. विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ बिघडलं. बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत. एका पत्रकारानं फोन करुन या प्रकरणात मी संशयित असल्याचं सांगितलं.
त्रासापासून मुक्तता हवी
मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस आणि पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं नमूद केलं आहे. पोलिसांकडून वारंवार होणाऱ्या चौकशीच्या त्रासापासून संरक्षण मिळावं, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी केली आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी पत्रातून केली.