Mansukh Hiren Murder Case:मोटार चोरी, स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा परस्पर संबंधाचा एटीएस करणार तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:07 PM2021-03-21T22:07:59+5:302021-03-21T22:12:23+5:30

मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ मोटारीची चोरी, मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मोटारीमध्ये मिळालेली स्फोटके आणि मनसुख यांची हत्या या तिन्ही गुन्हयांचा नेमकी परस्पर संबंध काय? याचा सखोल तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) करावयाचा आहे.

Mansukh Hiren Murder Case: ATS to probe car theft, explosives and Mansukh Hiren murder case | Mansukh Hiren Murder Case:मोटार चोरी, स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा परस्पर संबंधाचा एटीएस करणार तपास

एटीएस शोधणार हिरेन यांच्या हत्येचे कारण?

Next
ठळक मुद्देतब्बल १७ दिवसांनी केली दोघांना अटक एटीएस शोधणार हिरेन यांच्या हत्येचे कारण?

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ मोटारीची चोरी, मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मोटारीमध्ये मिळालेली स्फोटके आणि मनसुख यांची हत्या या तिन्ही गुन्हयांचा नेमकी परस्पर संबंध काय? याचा सखोल तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) करावयाचा आहे. त्यासंबंधीचे पुरावेही गोळा करायचे असल्यामुळे आरोपी नरेश गोर (३१) आणि विनायक शिंदे (५१) या दोघांनाही कोठडी देण्याची मागणी एटीएसनेठाणे न्यायालयात रविवारी केली.
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे आल्यानंतर तब्बल १७ दिवसांनी यातील दोन आरोपींना अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने नरेश आणि विनायक या दोघांना अटक केली. हा गुन्हा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे अटक आणि यातील पाहिजे आरोपी सचिन वाझे यांनी केलेल्या गुन्हयातील तांत्रिक आणि भौतिक पुरावे नष्ट करण्यासाठी नेमके काय केले? याचा आरोपींकडे सखोल तपास करावयाचा असल्याचे एटीएसने रविवारी ठाणे न्यायालयात सांगितले. वाझे तसेच अटकेतील दोघा आरोपींनी गुन्हयात वापरलेली वाहने याचा शोध घेऊन ती जप्त करावयाची आहेत. तसेच गुन्हयात वापरलेल्या मोबाईलचाही शोध बाकी आहे.
* खून नेमकी कसा केला?
अटकेतील आरोपी यांनी खूनासाठी वापरलेले साहित्य जप्त करायचे आहे. तसेच मनसुख यांच्या अंगावरील सोनसाखळी, पुष्कराज खडा असलेली सोन्याची अंगठी, मनगटी घडयाळ, मोबाईल फोन, पाकिट आणि पाकिटातील डेबीट कार्ड, क्रेडीट कार्डची विल्हेवाट कशी लावली? त्याचा शोध घेऊन ते जप्त करणे बाकी असल्याचेही एटीएसने सांगितले.
आरोपींनी मनसुख यांचा खून नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कुठे केला. खूनाचा कट कुठे रचला? या कटात आणखी कोण कोण सामील होते का ? या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी आरोपींची कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे मोटार चोरी, स्फोटके आणि खूनाचा गुन्हा यांचा परस्पर संबंध काय? याचाही आरोपींकडे सखोल चौकशी करायची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व बाजू ऐकल्यानंतर ठाणे न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Mansukh Hiren Murder Case: ATS to probe car theft, explosives and Mansukh Hiren murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.