मनसुख हिरेन पोलिसांचा खबऱ्या? पोलिसांकडून सॅम पीटरचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 03:06 AM2021-03-07T03:06:00+5:302021-03-07T03:06:29+5:30
पोलिसांकडून सॅम पीटरचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्रा येथील खाडीत शुक्रवारी मृतावस्थेत आढळलेले मनसुख हिरेन हे मुंबईतील पोलीस दलात काम करणाऱ्या व ठाण्यात वास्तव्याला असलेल्या एका अधिकाऱ्याकरिता खबरे म्हणून काम करीत होते, अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
राज्यातील सत्ताधारी पक्षासोबत सौहार्दपूर्ण संबंध राखून असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यासोबत हिरेन यांचे उत्तम संबंध होते. ठाण्यातील काही गुन्हेगारी कारवायांची माहिती हिरेन हे त्या अधिकाऱ्याला देत असल्याचे बोलले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अँटिलिया इमारतीच्या परिसरात हिरेन यांची चोरीस गेलेली मोटार सापडणे, हा निव्वळ योगायोग होता की, हिरेन यांना या संपूर्ण प्रकाराबद्दल अधिक पूर्वकल्पना होती, अशी शंका काहींनी व्यक्त केली. मुंबई पोलीस दलातील त्या अधिकाऱ्याच्या सीडीआरमध्ये हिरेन यांचा मोबाइल नंबर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने त्या अधिकाऱ्याला हिरेन हे गुप्त माहिती पुरवत होते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याच्या कटकारस्थानामधील माहितीप्रकरणात हिरेन हे एकमेव महत्त्वाचा दुवा होते. हिरेन यांचा तर मृत्यू झालाच; पण त्यांचा मोबाइल, पाकीट वगैरे सर्व चीजवस्तू गायब असल्याने संशय बळावला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा बुडून मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या फुुुप्फुसात पाणी भरलेले असते. हिरेन यांच्या फुप्फुसात जेवढ्या प्रमाणात पाणी भरलेले असायला हवे होते, तेवढे ते भरलेले नाही, असे ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हिरेन यांची जी स्कॉर्पिओ चोरीस गेली व स्फोटके ठेवण्याकरिता वापरली, त्या मोटारीचा मालक सॅम पीटर याचा पोलीस शोध घेत आहेत.
हिरेन यांचे पत्र ठरणार दुवा
अंबानी यांच्या घरापाशी स्फोटके ठेवल्यापासून आपला मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार करणारे पत्र हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाणे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिले होते. त्यामध्ये नागपाडा पोलीस, दहशतवादविरोधी पथक, काही पत्रकार यांची नावे घेऊन आरोप केले आहेत. या पत्राची दखल घेतली गेली असती, तरी हिरेन यांचा जीव वाचला असता, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. तर, हेच पत्र हिरेन यांना भोवले असण्याची शक्यता काही जण व्यक्त करीत आहेत.