कोरोनाच्या दोन्ही लाटेत जिल्ह्यात तब्बल ७५ डॉक्टरांनी गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:03+5:302021-07-01T04:27:03+5:30
ठाणे : कोरोनाच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. अनेकांचे संसार मोडकळीस आले. अनेकांच्या घरातील ...
ठाणे : कोरोनाच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. अनेकांचे संसार मोडकळीस आले. अनेकांच्या घरातील कर्ता माणूस या कोरोनाने हिरावून घेतला. याच कोरोनाच्या या दोन्ही लाटेत जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ७५ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील १६ डॉक्टरदेखील या कालावधीत कोरोनाबाधित झाले होते. परंतु, या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे या कोरोनाच्या संकटातही जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र काम करणाऱ्या या डॉक्टरांना गुरुवारच्या डॉक्टर दिनानिमित्त सलाम, अशा भावना व्यक्त होत आहेत.
दीड वर्षापासून कोरोनाचा कहर संपूर्ण देशात सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातही कोरोनाची लाट मार्च २०२० मध्ये आली. त्यानंतर आजही कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ३० हजार ७४९ कोरोनाबाधित झाले असून पाच लाख १५ हजार ३१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १० हजार ६७८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या प्रत्यक्ष स्वरूपात चार हजार ७५५ जणांवर उपचार सुरू आहेत. पहिल्या लाटेत एकीकडे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू होती, तर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु, आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मिळावा, यासाठी डॉक्टरांची धडपड दिसून आली. काही ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन मिळाला, तर काही ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला. यावरून डॉक्टरांनादेखील दोषी ठरविले गेले होते. असे असतानाही समाजाप्रती आपले काही तरी देणे असल्याने आपला जीव धोक्यात घालून अनेक डॉक्टरांनी आपली सेवा प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
परंतु रुग्णांवर दिवस-रात्र उपचार करीत असताना कोरोनाने या डॉक्टरांवर घाला घातला. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७५ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक डॉक्टरांच्या कुटुंबाचे घराचे छप्पर या कोरोनाने एका-एका दिवसात हिरावून घेतले आहे. तरीदेखील हार न मानता डॉक्टर आजही दिवस-रात्र रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याला आजच्या डॉक्टर दिनानिमित्त सलाम!
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील दीड वर्षापासून हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. अशातच १६ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. परंतु, या डॉक्टरांनी याच रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनावर यशस्वी मात केली, तर दुसरीकडे ठाणे शहरात आतापर्यंत १० डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
...............
कोरोना हा आजार नवीन असल्याने, रुग्णांवर उपचार करायचे कसे, याची पूर्ण माहिती नसतानादेखील, डॉक्टर हिरीरीने या कामात आघाडीवर होते. त्यात अनेक डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली, तर त्यांच्या वयोवृद्ध पालकांनादेखील संसर्ग झाल्याचे दिसून आले. त्यात अनेक डॉक्टरांचा व त्यांच्या काही पालकांचादेखील कोरोनामध्ये मृत्यू झाला आहे. परंतु, असे असतानाही आम्ही आजही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाही. आम्ही याचा सामना करण्यासाठी नेहमीच सज्ज आहोत.
(- डॉ. संतोष कदम - इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे - अध्यक्ष)