मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपाच्या आढावा बैठकीस माजी आमदार आल्याने अनेक भाजपा नगरसेवकांचा बहिष्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:28 AM2020-11-10T00:28:22+5:302020-11-10T00:28:39+5:30

माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या वादग्रस्त अर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याच्या अनुषंगाने राजकारण सोडल्याचे जाहीर केले होते .

Many BJP corporators boycotted due to former MLA's attendance at BJP review meeting in Mira Bhayander Municipal Corporation | मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपाच्या आढावा बैठकीस माजी आमदार आल्याने अनेक भाजपा नगरसेवकांचा बहिष्कार 

मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपाच्या आढावा बैठकीस माजी आमदार आल्याने अनेक भाजपा नगरसेवकांचा बहिष्कार 

Next

मीरारोड -  मीरा भाईंदर महापालिकेची महासभा होणार असल्याने त्या अनुषंगाने पालिकेत बोलावण्यात आलेल्या भाजपा नगरसेवकांच्या आढावा बैठकीत माजी आमदार नरेंद्र मेहता उपस्थित असल्याचे पाहून भाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी त्यास हरकत घेतली. तर मेहता बठकीस असल्याचे कळताच भाजपचे अनेक नगरसेवक बैठकीतुन निघून गेले . तर अनेक जण आलेच नाही . या मुळे भाजपातील मेहता विरोध पुन्हा उफाळून आला असून भाजपात दोन गट निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे . 

माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या वादग्रस्त अर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याच्या अनुषंगाने राजकारण सोडल्याचे जाहीर केले होते . तर भाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी दिलेल्या फिर्यादी नंतर मेहतांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला . राजकारण सोडल्याचे सांगणारे मेहता मात्र पालिकेत आणि पक्षात देखील हस्तक्षेप करत असल्याचा आरोप भाजपातील अनेक नगरसेवक आदींनी सुरु केला . मेहतां वर दाखल गुन्हे , त्यांचा विरुद्ध नागरिकां मध्ये असणाऱ्या रोषा मुळे विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव , त्यांच्या वादग्रस्त प्रतिमे मुळे पक्षाची बदनामी तसेच पालिका व पक्षातील त्यांची मनमानी आदी मुद्द्यांवर पक्षातूनच  विरोध सुरु झाला आहे. 

तर मेहता हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या जवळचे मानले जात असल्याने पक्षातील विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले . ६१ पैकी सुमारे निम्म्या नगरसेवकांच्या विरोधा नंतर चव्हाण यांनी भाईंदर मध्ये येऊन नगरसेवकांची बैठक घेतली होती . त्यावेळी देखील मेहता हे चव्हाण सोबत व्यासपीठावर होते . चव्हाणां समोरच मेहता समर्थक आणि विरोधक भिडले व राडा झाला होता . 

मात्र त्या नंतर देखील चव्हाण यांनी महापौर ज्योत्सना हसनाळे व स्थायी समिती अशोक तिवारी यांना बोलावून मेहतांच्या मार्गदर्शना खाली काम करा अशी समज दिल्याचे समजते . या प्रकरणी चव्हाण यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क करून संदेश पाठवून देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती . तर उल्हासनगर प्रमाणे चव्हाणां मुळे मीरा भाईंदर मध्ये भाजपाला फटका बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली . 

तर अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश करताच मेहता हे राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत . आज सोमवारी पालिकेतील स्थायी समिती सभागृहात भाजपा नगरसेवकांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती . या वेळी महापौर हसनाळे सह अन्य पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे तसेच नगरसेवक उपस्थित होते . परंतु बैठकीस नरेंद्र मेहता असल्याचे कळल्याने भाजपाच्या अनेक नगरसेवकांनी बैठकी कडे पाठ फिरवली . तर अनेक नगरसेवकांनी हजेरी लावून बैठकीतून निघून जाणे पसंत केले . त्यामुळे बैठकीत भाजपचे निम्म्या पेक्षा कमी नगरसेवक होते . तर मेहतांना बैठकीत पाहून नगरसेविका नीला सोन्स यांनी जोरदार आक्षेप घेतला . जर राजकारण सोडल्याचे जाहीर केलेले आहे तर मेहता बैठकीस कसे ? पक्षाच्या नगरसेवकांची बैठक असताना मेहता काय म्हणून उपस्थित आहे आदी प्रकारचे प्रश्न व मुद्दे सोन्स यांनी उपस्थित केल्याचे समजते . या प्रकरणी जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधून देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही .

Web Title: Many BJP corporators boycotted due to former MLA's attendance at BJP review meeting in Mira Bhayander Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.