अनेक उदयोन्मुख कलाकारांना गंडा घालून तो मौजमजा करायचा!

By जितेंद्र कालेकर | Published: August 7, 2019 09:50 PM2019-08-07T21:50:39+5:302019-08-07T22:03:47+5:30

चित्रपटात चांगली भूमीका मिळवून देतो, पण त्यासाठी पोर्टफोलिओ बनवावा लागेल. याच पोर्टफोलिओच्या नावाखाली नविन कलाकारांकडून उकळलेल्या लाखो रुपयांद्वारेच संदीप महादेव व्हरांबळे ऊर्फ संदीप पाटील ऊर्फ सॅण्डी हा मौजमजा करीत होता, अशी माहिती तपासामध्ये समोर आली आहे.

 Many emerging artists embrace it and have fun! | अनेक उदयोन्मुख कलाकारांना गंडा घालून तो मौजमजा करायचा!

नविन कलाकारांकडून पोर्टफोलिओच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

Next
ठळक मुद्देमहाराष्टÑ आणि गोव्यातील कलाकारांची फसवणूकआधी लघुचित्रपटांचे दिग्दर्शनही केलेनविन कलाकारांकडून पोर्टफोलिओच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

ठाणे : महाराष्टÑासह गोव्यातील अनेक उदयोन्मुख कलाकारांना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून संदीप महादेव व्हरांबळे ऊर्फ संदीप पाटील ऊर्फ सॅण्डी (३२, रा. कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे) हा लाखो रुपये उकळत होता. याच पैशांद्वारे तो मौजमजा करत होता, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीमध्ये समोर आली आहे.
चित्रपटात तसेच टीव्हीवरील मालिकांमध्ये भूमिका साकारण्याचे काम मिळवून देण्याच्या नावाखाली उदयोन्मुख कलाकारासह त्यांच्या पालकांची फसवणूक करणाऱ्या संदीपला आता गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने ५ आॅगस्ट २०१९ रोजी अटक केली. पूर्वी दिग्दर्शकाचे काम करणा-या संदीपने काही लघुचित्रपटांचीही निर्मिती केली आहे. अर्थात, त्या चित्रपटांची फारशी चर्चा झालेली नसली, तरी त्याच जोरावर त्याने उदयोन्मुख कलाकारांना एक चांगले व्यासपीठ देऊन नामांकित चित्रपटात किंवा जाहिरातीमध्ये चमकण्याची संधी देऊ शकतो, अशी प्रलोभने अनेक कलाकारांना दाखवली. डोंबिवलीतील रवींद्र कुलकर्णी यांनी याबाबत ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जामुळे या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे आणि उपनिरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकाने केला. त्याने महाराष्टÑासह गोवा राज्यातील १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची सुमारे १५ लाखांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. एखाद्या नवीन कलाकाराला हेरल्यानंतर त्याला आणखी चमकण्याची संधी असल्याची बतावणी करीत त्याच्याकडून पोर्टफोलिओ बनवण्याच्या नावाखाली तो ११ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत पैसे काढायचा. पुढे हे पैसे किंवा पोर्टफोलिओदेखील तो बनवत नसायचा. साधारण २०१४ पासून त्याने महाराष्टÑातील अनेक जिल्ह्यांमध्ये असेच प्रकार केले. त्यानंतर, गोव्यामध्येही अनेकांना गंडा घातला. आतापर्यंत ठाणे पोलिसांकडे अशा ३० ते ३५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत.
*बँक खाती सील करणार
पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तो दुस-या पत्नीबरोबर वास्तव्य करत होता. चांगले राहणीमान ठेवून याच पैशांमधून तो मौजमजा करत होता. त्याची कोल्हापूरच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि आयसीआयसीआय या बँकांमध्ये खाती असून ती ‘सील’ करण्यासाठी पोलिसांचा पत्रव्यवहार सुरू आहे. त्याची बँकांमधील गुंतवणूक तसेच स्थावर मालमत्तांचीही चौकशी सुरू असून ती मालमत्ताही जप्त करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  Many emerging artists embrace it and have fun!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.