मनोरुग्णालयावर अनेकांचा डोळा
By admin | Published: July 16, 2016 01:46 AM2016-07-16T01:46:44+5:302016-07-16T01:46:44+5:30
रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी मेंटल हॉस्पिटलची जागा मिळावी, असा वाद सुरू असतानाच याच मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील १० एकर जागा मिळा
पंकज रोडेकर, ठाणे
रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी मेंटल हॉस्पिटलची जागा मिळावी, असा वाद सुरू असतानाच याच मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील १० एकर जागा मिळावी म्हणून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनानेही हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचाली शासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयास ५४१ बेडला मंजुरी दिल्यानंतर सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ती जागा मिळत नसेल तर, अन्यथा दुसरा पर्यायही रुग्णालय प्रशासनाने डोळ्यांसमोर ठेवला.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले विठ्ठल सायन्ना रुग्णालय हे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणून ओळखले जाते. ते सध्या ३३२ बेडचे आहे. वेगवेगळ्या चार इमारतींमध्ये त्याचा कारभार सुरू आहे. याचदरम्यान, शहरी आणि ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय ५४१ बेडचे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याला शासनस्तरावर मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे सुपरस्पेशालिटी आणि जिल्हा शासकीय रुग्णालय उभारण्यासाठी मोठ्या जागेची गरज लक्षात घेऊनच मेंटल हॉस्पिटलमधील १० एकर जागा मिळावी, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने केली आहे. जर ही जागा मिळत नसेल तर सध्याचे उभे असलेले रुग्णालय आणि परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह पाडून त्या जागेत टोलेजंग इमारतींचे बांधकाम करावे लागणार आहे.