गोळवलीत अनेक घरांमध्ये शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:15+5:302021-07-20T04:27:15+5:30
कल्याण : केडीएमसीअंतर्गत येणाऱ्या कल्याण-शीळफाटा रोडवरील मानपाडा पोलीस ठाणे, गोळवली गाव, रिजन्सी अनंतम या परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले ...
कल्याण : केडीएमसीअंतर्गत येणाऱ्या कल्याण-शीळफाटा रोडवरील मानपाडा पोलीस ठाणे, गोळवली गाव, रिजन्सी अनंतम या परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे तेथील अनेक घरांमध्ये पाणी गेले आहे.
केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक १०९ गोळवली गाव परिसरात पावसामुळे ४० वर्षांत कधीही पाणी साचलेले नाही. मात्र, रविवारपासून तेथे पाणी साचले आहे. कल्याण-शीळफाटा रस्त्याचे काम एमएसआरडीसीने केले आहे. रस्त्याचे काम करताना पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या लहान-मोठ्या मोऱ्या व काही नाले बुजविले गेले. याबाबत एमएसआरडीसीकडे वारंवार तक्रारी केल्या, निवेदने दिली. मात्र, त्याची संबंधित मंत्रालयाने दखल घेतली नाही, अशी माहिती गोळवली येथील भाजपचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. या चार गावांतील पाणी जाण्यासाठी एमएसआरडीसीने रस्ता बांधताना काळजी घेतली नाही. नगरसेवक म्हणून मी वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र, अधिकारी दाद देत नाहीत, असे ते म्हणाले.
गोळवली गावाजवळ कल्याणचे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यात रविवारी पावसाचे पाणी शिरले होते, असेही पाटील म्हणाले. या भागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील नाल्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
-----------------