आमची कामे पाहूनच शिवसेनेत अनेकांचा प्रवेश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 07:49 AM2023-06-04T07:49:01+5:302023-06-04T07:49:53+5:30
मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर आम्ही मुंबईकडे विशेष लक्ष देत आहोत.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गेल्या काही वर्षांपासून मुंबईचा विकास थांबला होता. मात्र, आमचे सरकार येताच पुन्हा विकासकामे सुरू झाली आहेत. येत्या अडीच वर्षांत मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटचे करून मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्त्यावरून प्रवास करणे शक्य होणार आहे. आता ही कामे पाहूनच अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक एकनाथ हुंदरे आणि गणेश भंडारी यांनी शुक्रवारी रात्री ठाण्यात शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. ठाण्याच्या महापौर निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिंदे यांनी हुंदरे आणि भंडारी यांचे भगवा दुपट्टा देऊन शिवसेनेत स्वागत केले. या दोघांव्यतिरिक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यात शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी विभागली गेली आहे.
मुंबईकडे विशेष लक्ष
मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर आम्ही मुंबईकडे विशेष लक्ष देत आहोत. येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंट हे माझे स्वप्न होते. त्याकरिता मी सभागृहात आवाजही उठवला होता. हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.