जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये होणार दाखल, संजय केळकर यांचा गौप्यस्फोट
By अजित मांडके | Published: March 13, 2024 05:34 PM2024-03-13T17:34:29+5:302024-03-13T17:35:56+5:30
कॉंग्रसेचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्टात दाखल झाली आहे.
अजित मांडके,ठाणे : कॉंग्रसेचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्टात दाखल झाली आहे. परंतु राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्याच्या दौºयावर येत असतांना त्या आधीच जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होतील असा दावा भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १५ आणि १६ मार्च रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौºयावर आहेत. त्यात ठाण्यातील कॉंग्रेसमध्ये या निमित्ताने पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे आता राहुल गांधी येण्यापूर्वीच ठाणे जिल्ह्यातील कॉंग्रेसचे बरचेसे नेते, पदाधिकारी हे कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा करण्यात आल्याने उरली सुरली कॉंग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकीकडे ठाण्यात राहुल गांधी यांच्या दौºयाचे नियोजन कॉंग्रेसकडून आखले जात असतांना अंतर्गत वादामुळे ही यात्रा आता वेगळ्या वळणावर आल्याचे दिसत आहे. त्यात आता कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आल्याचेही उघड झाले आहे. ठाण्यात कॉंग्रेसचे इन मीन तीन नगरसेवक होते. त्यातही आजही येथील अंतर्गत वाद संपुष्टात आलेला नाही. जिल्ह्यातही कॉंग्रेसची तशीच परिस्थिती आहे. त्यात दौरा कॉंग्रेसच्या नेत्याचा असतांना तो राष्ट्रवादी आमदाराच्या मतदार संघातून जात असल्याने कॉंग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी जिथे जिथे जात आहेत, त्यांची यात्रा जिथे जिथे जात आहे, त्याठिकाणी देशात किंवा राज्यात त्यांचे पदाधिकारी इतर ठिकाणी जात आहेत, महाराष्टात देखील ते येण्याच्या तोंडावर कॉंग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात देखील आता राहुल गांधी येत असतांना कॉंग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये येतील असा दावा केळकर यांनी केला आहे.
अशोक चव्हाणांचे समर्थक घेणार भाजपकडे धाव - अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे समर्थक असलेले पदाधिकारी देखील आता टप्याटप्याने भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यानुसार ठाण्यासह जिल्ह्यात देखील चव्हाण यांचे समर्थक असल्याने तेच आता भाजपमध्ये जातील असे चित्र या निमित्ताने दिसत आहे.