शहापूर तालुक्यात अनेक जण घरांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:01 AM2018-09-01T04:01:21+5:302018-09-01T04:02:46+5:30

पंतप्रधान आवास योजना : दारिद्रयरेषेचे सर्वेक्षण चुकीचे असल्याचा बसला फटका

Many people await the houses in Shahapur taluka | शहापूर तालुक्यात अनेक जण घरांच्या प्रतीक्षेत

शहापूर तालुक्यात अनेक जण घरांच्या प्रतीक्षेत

Next

भातसानगर : शहापूर तालुक्यात आजही अनेक कुटुंबे पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत असून केवळ दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा असल्याचा फटका अनेक लाभार्थ्यांना बसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून तालुक्यात शेकडो घरकुले तयार झाल्याचे पुढे आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र ज्यांना त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्यांना तो आजही मिळत नसल्याचे दिसते आहे.

तालुक्यात आदिवासींप्रमाणेच कातकरी या आदिम जमातीला त्याचा अधिक लाभ मिळणे आवश्यक असतानाही तो मिळत नसल्याचे दिसते आहे. ठाणे जिल्ह्यात तसेच खासकरून शहापूर तालुक्यात ही जमात अधिक संख्येने राहते. मात्र, त्या जमातीला हवा तितका लाभ मिळाला नाही. त्यांच्याबरोबर इतर दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ होणे गरजेचे आहे. ही एक प्रकारची भटकी जमात असून यावर्षी या गावात तर पुढील वर्षी दुसऱ्या गावी, उन्हाळ्याच्या दिवसांत कामानिमित्त आठ महिने वीटधंद्यावर गुजराण सुरू असते. त्यामुळेच अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही.

२०१५-१६ मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६८४ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी ६५९ पूर्ण करण्यात आली. त्यासाठी सहा कोटी २६ लाख पाच हजार रु पयांचे वाटप करण्यात आले. तर, २०१६-१७ मध्ये १२४१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ११४१ पूर्ण झाली. यासाठी १३ कोटी ६९ लाख २० हजार रुपयांचे वाटप केले. २०१७-१८ मध्ये ३८९ घरकुलांना मंजुरी मिळाली, त्यातील २७९ घरे पूर्ण झाली. यासाठी ३३ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. २०१८-१९ मध्ये २४३ घरकुले मंजूर झाली असून अद्याप एकही पूर्ण झालेले नाही. यासाठी सहा लाख ७५ हजार रु पयांचे वाटपदेखील करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार २०१६ ते १९ पर्यंत १८७३ एवढ्या घरांचा उद्देश पूर्ण केला असून ९२७ शिल्लक असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे. २०११ च्या सर्वेक्षणानुसार सात हजार लाभार्थी पात्र ठरले होते. त्यानुसार, क्षेत्रीय पाहणी करून २८०० चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

तालुक्यातील क्षेत्रीय सर्व्हेनुसार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांना त्याचा लवकरात लवकर लाभ देण्याचा प्रयत्न असेल. - सुशांत पाटील, सहा. गटविकास अधिकारी

आदिवासी तसेच कातकरी या आदिम जमातींना कोणतेही निकष न लावता पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. खरेतर, करण्यात आलेला दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा आहे. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला, त्यांची माहिती मी घेणार आहे. खरे लाभार्थी मात्र यापासून वंचित राहिले आहेत.
- पांडुरंग बरोरा, आमदार

Web Title: Many people await the houses in Shahapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.