भाईंदरमधील अनेक सार्वजनिक शौचालये रात्रीची बंद असल्याने रहिवाशांची कुचंबणा

By धीरज परब | Published: October 5, 2024 01:11 PM2024-10-05T13:11:10+5:302024-10-05T13:18:46+5:30

मीरा भाईंदर महापालिकेची शहरांमध्ये सुमारे दीडशे पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालय आहेत.

Many public toilets in Bhayandar are closed at night,Problem to residents | भाईंदरमधील अनेक सार्वजनिक शौचालये रात्रीची बंद असल्याने रहिवाशांची कुचंबणा

प्रातिनिधिक फोटो

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या काही भागातील मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांना रात्री बारानंतर टाळे मारले जात असल्याने रहिवाशांची अडचणीच्या वेळी कुचंबणा होत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेची शहरांमध्ये सुमारे दीडशे पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालय आहेत. शौचालय ही मुख्यत्वे शहरातील झोपडपट्टी भागात आहेत. सदर शौचालयांची देखभाल दुरुस्ती व दैनंदिन साफसफाई महापालिकेच्या माध्यमातून ठेकेदार करत आले आहेत. तसेच शौचालयांचे दैनंदिन संचालन देखील ठेकेदारामार्फत केले जात होते. 

सार्वजनिक शौचालय ही विशेषता झोपडपट्टी भागातील नागरिकांची नैसर्गिक विधीसाठीची अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालय २४ तास उघडी ठेवणे आवश्यक आहे. परंतु भाईंदर पश्चिमेच्या महात्मा गांधीनगर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर नगर व भोला नगर झोपडपट्ट्यांमधील असलेली महापालिकेची सार्वजनिक शौचालये रात्री बारानंतर बंद केली जात असल्याचे समोर आले आहे. 

सदर भागात पैसे द्या व वापरा या तत्त्वावर ३ सार्वजनिक शौचालय आहेत.  तर महापालिकेची ४ शौचालय आहेत. शौचालय मध्यरात्री १२  ते पहाटे ५  वाजेपर्यंत बंद ठेवली जातात. रात्रीच्या वेळी १२ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत सार्वजनिक शौचालय बंद असल्याने येथील रहिवाशांना त्यातही विशेषता महिलांना शौचालयास जायचे असल्यास मोठी कुचंबणा होते. त्यांना नाईलाजाने सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास जावे लागते. रात्रीच्या वेळी उघड्यावर शौचास जाणे धोकादायक असतेच पण महिलांना खूपच जाचक ठरते.

 हे अतिशय गंभीर आहे. ठेकेदार व अधिकारी समन्वय करुन लाखो रुपये शौचालयावर खर्च करुन देखील आजवर २४ तास शौचालय उघडे ठेवले जात नाही. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास जाणे भीतीदायक आहे. शौचालय ही मूलभूत गरज असल्याने सार्वजनिक शौचालये २४ तास उघडी असणे आवश्यक आहे. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या भागातील शौचालय नियमबाह्यपणे बंद केली जात असतात. याबाबत आपण महापालिकेस लेखी तक्रार केली असून सार्वजनिक शौचालये २४ तास उघडी न ठेवल्यास आंदोलन केले जाईल असे भाजपाचे उत्तन मंडळ अध्यक्ष शैलेश म्हामुणकर यांनी सांगितले. 
 

Web Title: Many public toilets in Bhayandar are closed at night,Problem to residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.