ठाण्यातील अनेक रस्ते खड्ड्यात; निधी लाटण्यासाठी चकाचक रस्त्यांवर पुन्हा डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 09:20 PM2021-02-07T21:20:57+5:302021-02-07T21:24:46+5:30
कॅडबरी सिग्नल ते माजीवडा फ्लॉवर व्हॅली या सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे ठेकेदाराच्या फायद्यासाठी डांबरीकरण करण्यात येत असल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी उघड केला आहे. विशेष म्हणजे पठाण यांनी रविवारी सकाळी ८ वाजता या कामाची पाहणी करून चौकशीचीही मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्या भागात रस्त्यांची दुरूस्ती केली जात नाही. मात्र, कॅडबरी सिग्नल ते माजीवडा फ्लॉवर व्हॅली या सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे ठेकेदाराच्या फायद्यासाठी डांबरीकरण करण्यात येत असल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी उघड केला आहे. विशेष म्हणजे पठाण यांनी रविवारी सकाळी ८ वाजता या कामाची पाहणी करून चौकशीचीही मागणी केली आहे.
ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असताना ठाणे महापालिकेच्या संबंधित खात्याकडून लक्ष दिले जात नाही. मात्र, बिटकॉन या कंपनीच्या आर्थिक लाभासाठी ठामपाने पायघडया अंथरल्या आहेत. कॅडबरी जंक्शन येथून फ्लॉवर व्हॅलीमार्गे माजीवडयाच्या दिशेने जाणाऱ्या चांगल्या सेवा रस्त्यावर पुन्हा डांबरीकरणाचा घाट घातला जात आहे. त्यासाठी लाखो रूपये बिटकॉन आणि ठेकेदार गांधी यांच्यावर उधळण्यात येणार आहेत.
ठाणेकरांच्या करातून ही उधळपट्टी होत असल्याने पठाण यांनी रविवारी सकाळी या भागाचा पाहणी दौरा केला. जनतेच्या करातून ठेकेदाराच्या हितासाठी केली जाणारी ही उधळपट्टी आम्ही सहन करणार नाही. ठेकेदाराच्या फायद्यासाठी ठामपाच्या अधिकाऱ्यांनी हे डांबरीकरण करण्याचे धोरण आखले आहे. त्यामध्ये संबंधित अधिकाºयांच्या टक्केवारीचाही समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही पठाण यांनी केली आहे.
...........................