उल्हासनगरात शासनाचे आदेशाला केराची टोपली, अनेक शाळा सुरू, मनसे आक्रमक
By सदानंद नाईक | Published: July 27, 2023 07:55 PM2023-07-27T19:55:01+5:302023-07-27T19:55:47+5:30
शाळा प्रशासनाला मुलांना सुट्टी देण्यास भाग पाडले आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : शिक्षण विभागाने अतिवृष्टीची इशारा देऊन जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरवारी सुट्टी देण्यात आली. मात्र काही शाळांनी विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शाळा सुरू ठेवल्याचा प्रकार मनसेने उघड केला असून शाळा प्रशासनाला मुलांना सुट्टी देण्यास भाग पाडले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील एक शाळा ही शिक्षण विभागाने अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर केल्यानंतरही सुरू ठेवल्याचा प्रकार मनसे विद्यार्थी संघटनेने उघड केला. मनसेचे प्रदीप गोडसे, विध्यार्थी सेनेचे वैभव कुलकर्णी आदींनी शाळेला धडक देऊन, शाळा सुरू ठेवल्या बाबत जाब विचारला. तसेच महापालिका शिक्षण विभागाला याबाबत माहिती दिल्यावर, शाळा प्रशासनाने मुलांना घरी सोडण्यात आले. शासनाच्या सुट्टीच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याबाबत शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी मनसे विध्यार्थी संघटनेने केली. तसेच संततधार पाऊस असतांना व शाळेला सुट्टी असतांना शाळा प्रशासन सक्तीने शिक्षकांना शाळेत बोलावीत असल्याने, अश्या शाळेवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
कॅम्प नं-४ येथील शाळेतील मुलांच्या पालकांनी मनसे विध्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सुट्टी असताना, शाळा सुरू ठेवल्याचा प्रकार सांगितल्याची माहिती गोडसे यांनी दिली. याबाबत महापालिका शिक्षण विभागचे प्रशासन अधिकाऱ्यांना संपर्क केला असता झाला नाही. मात्र अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले.