पासचा जुगाड करून अनेकांचा रेल्वेने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:20+5:302021-07-19T04:25:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांत सर्वसामान्य प्रवाशांना बंदी असतानाही अनेक प्रवासी पासचा जुगाड करून थेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांत सर्वसामान्य प्रवाशांना बंदी असतानाही अनेक प्रवासी पासचा जुगाड करून थेट रेल्वेने प्रवास करीत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी नसतानाही अनेक कर्मचारी रेल्वेने प्रवास करताना दिसत आहेत.
अनेक प्रवाशांनी तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून बनावट आयडी कार्डही तयार केले आहेत. याच आयडी कार्डच्या आधारावर पास काढून थेट रेल्वेने प्रवास करीत आहेत; तर काही प्रवासी ओळखीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पास काढून रेल्वेने प्रवास करीत आहेत. पास मिळाला तर सर्व काही ठीक होते, अशी धारणा या जुगाड करणाऱ्या नोकरदारांची आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांत सकाळच्या वेळेस सर्वच कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासले जात नसल्याने त्याच संधीचा लाभ घेत अन्य प्रवासी लोकलने प्रवास करीत आहेत. नियमित प्रवास करण्यासाठी तिकीट परवडत नसल्याने ते कर्मचारी पासचा जुगाड करीत आहेत; तर काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित बनावट ओळखपत्र तयार करून त्या ओळखपत्राच्या आधारावर पास काढले आहेत.
महिन्याभरात अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांत तब्बल ४५ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही संख्या अल्प असून पोलिसांची तपासणी होत नसल्याने कोणी कर्मचारी सापडत नसल्याची बाब समोर आली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रेल्वेबंदीच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळत आहे. अंबरनाथ आणि बदलापुरात एकूण प्रवाशांपैकी २० टक्के कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील नसल्याचा अंदाज आहे.
-------------------------
नोकरी आहे तर घर चालणार; त्यामुळे थोडीशी रिस्क घ्यावीच लागते. पासचा जुगाड झाला तर रेल्वेच्या कारवाईला न घाबरता प्रवास करावा लागतो. त्याशिवाय आम्हांला पर्याय नाही.
- रोशनी पवार, रेल्वे प्रवासी, बदलापूर.