मोहम्मद रफींवर आयुष्य उधळून देणारे अरफनमौला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:32 AM2017-07-30T02:32:34+5:302017-07-30T02:32:37+5:30

ख्यातनाम गायक मोहम्मद रफी यांचे दोन शागीर्द गफ्फार शेख आणि रशीद मणियार आजही आपल्या लाडक्या तानसेनाला भक्तिभावाने पुजत आहेत.

maohamamada-raphainvara-ayausaya-udhalauuna-daenaarae-araphanamaaulaa | मोहम्मद रफींवर आयुष्य उधळून देणारे अरफनमौला

मोहम्मद रफींवर आयुष्य उधळून देणारे अरफनमौला

Next

-  मुरलीधर भवार 

कल्याण : ख्यातनाम गायक मोहम्मद रफी यांचे दोन शागीर्द गफ्फार शेख आणि रशीद मणियार आजही आपल्या लाडक्या तानसेनाला भक्तिभावाने पुजत आहेत. गफ्फार शेख हे १९९५ ते ९८ या काळात जुहू येथील रफी यांच्या समाधीस्थळावर दिवसभर जाऊन बसत होते. मणियार यांना रफी यांचा सहवास लाभला असल्याने ते क्षण त्यांनी हृदयाच्या कुपीत अक्षरश: जपून ठेवले आहेत. मणियार यांनी रफींच्या मैफलींचे आयोजन करण्याकरिता आतापर्यंत सात लाखांची पदरमोड केली आहे.
रफी यांचा ३१ जुलै हा स्मृती दिन. रफी यांना जाऊन ३७ वर्षे झाली, तरीही देशभरात त्यांचे अनेक चाहते आजही या दिवशी रफी यांची आठवण काढतात. अनेक ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
गफ्फार शेख मूळचे आंध्र प्रदेशातील. त्यांचे कुटुंब कामानिमित्त कल्याणला आले व तेथेच स्थायिक झाले. गफ्फार यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमातून झाले. त्यांना गाणी ऐकण्याचे वेड लहानपणीच लागले. रफी यांची गाणी आवडू लागली. रफी यांची गाणी जमवणे, त्यातील बारकावे समजून घेणे, हा छंद त्यांना लागला. जुहू येथे कामाला लागलेल्या गफ्फार यांना तेथेच रफी यांची समाधी असल्याचे समजल्यावर त्यांनी ती गाठली. ही गोष्ट आहे १९९५ सालची. रफींच्या समाधीवर गेल्यावर गफ्फार यांना आत्मिक समाधान लाभू लागले. त्यामुळे दररोज पहाटे कल्याणहून पहिली गाडी पकडून ते रफी यांच्या समाधीपाशी पोहोचत. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते तेथेच बसून राहत. हा सिलसिला १९९८ सालापर्यंत म्हणजे तब्बल चार वर्षे सुरू होता. गफ्फार यांना लागलेले रफींचे हे वेड त्यांच्या कुटुंबाकरिता चिंतेचा विषय बनले. त्यानंतर, त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. कामधंदा सुरू केल्यावर रफी यांचे सहगायक, गीतलेखक यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यात त्यांचा बराच वेळ गेला. लोकवर्गणीतून त्यांनी भिवंडी येथे रफी यांच्या स्मरणार्थ एक संगीत कार्यक्रम २०१० साली आयोजित केला होता. त्या वेळी रफी यांचे चिरंजीव शाहीद रफी यांना निमंत्रित केले होते.
कल्याणमध्येच राहणारे रशीद मणियार हेही दुसरे रफीवेडे. त्यांनी रफी यांच्यासोबत काम केले. रेडिओवरील चिरपरिचित अमीन सयानी यांच्या पुढाकाराने रशीद यांनी १९७७ साली ‘रोशन नाइट’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात रफी यांच्यासोबत मुकेश व हेमलता यांनी गाणी सादर केली होती. रफी यांची रशीद यांनी एक आठवण सांगितली की, रफी हे यांचे जावई फरीद यांच्यासोबत गाडीने जात असताना रस्त्यात एक फकीर पाहून रफींनी चालकास गाडी थांबवण्याची सूचना केली. त्यांनी त्यांच्या पायातील बूट काढून अनवाणी फकिराला दिले. हे पाहून त्यांचे जावई थक्क झाले. ही आठवण खुद्द त्यांच्या जावयाने आपल्याला सांगितल्याचे रशीद म्हणाले.
एकदा रफी गाणे गाऊन स्टुडिओतून बाहेर पडत होते, त्या वेळी एक गरजवंत त्यांच्याकडे आला व त्याने त्याच्या मुलीच्या लग्नाकरिता पैशांची मागणी केली. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता रफींनी खिशात हात घालून हातात आलेले नोटांचे पुडके त्या गरजवंताच्या हाती टेकवले. रफी यांच्या सहकाºयाने रफीसाहेबांना विचारले की, साहेब, तुम्ही पैसे न मोजताच दिले. त्यावर रफी यांनी उत्तर दिले की, उपरवालेने हमे गिनके दिया नही तो मै इसे कैसे गिनकर दे दू. रफींचे हे उत्तर ऐकून सहकारी थक्कच झाला. रशीद यांनी सांगितले की, लोक आपल्या आई-वडील बहीण-भाऊ यांना एकवेळ विसरतात. मात्र, रफींना विसरत नाहीत.

रफी की याद नौशाद के साथ
रशीद व गफ्फार यांनी मिळून येत्या सोमवार, ३१ जुलै रोजी अत्रे रंगमंदिरात रफींच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, रंगमंदिराची दुरुस्ती देखभाल असल्याने त्यांनी तूर्त स्थगित केला. दि.२४ डिसेंबर हा रफी यांचा तर २५ डिसेंबर हा संगीतकार नौशाद यांचा जन्मदिन असतो.
त्यानिमित्त २४ डिसेंबर रोजी ‘मोहम्मद रफी की याद नौशाद के साथ’ हा कार्यक्रम होणार आहे. रशीद यांना प्रदीप सोनटक्के यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
रफी यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्याकरिता रशीद यांनी आतापर्यंत किमान सात लाखांची पदरमोड केली आहे.

Web Title: maohamamada-raphainvara-ayausaya-udhalauuna-daenaarae-araphanamaaulaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.