ठाण्यात मराठा समाजाचा रास्ता रोकोचा प्रयत्न; १२ कार्यकर्त्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 08:57 PM2024-02-24T20:57:04+5:302024-02-24T20:58:55+5:30
ठाण्यात आंदोलनाचा प्रयत्न करणाºया सुमारे १२ कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
ठाणे: राज्य सरकारने १० टक्के मराठा आरक्षण दिले. मात्र कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेल्या परिपत्रकातील सगेसोयरे या शब्दाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यांच्या आदेशावरून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. बारावीच्या परिक्षेमुळे ठाण्यात प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करण्यात येणार होते. ठाण्यात आंदोलनाचा प्रयत्न करणाºया सुमारे १२ कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्यांचा मोठा प्रश्न मार्गी लागला. या निर्णयाचे ठाणेकरांनी स्वागत केले. त्याचवेळी ओबीसी मधून मराठ्यांना हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात आंदोलन केली आहेत. हे आंदोलन थांबविण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढले आणि कुणबी प्रमाणपत्र सापडले आहेत, त्यांच्या सगेसोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली. मात्र त्या परिपत्रकाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही. सहा लाख हरकती आल्याने त्यांचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे विधिमंडळात घेतली आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. त्यानुसार आज राज्य भरात रास्ता रोको करण्यात आले.
ठाण्यातील मराठा कार्यकर्त्यांनी वर्तकनगर, कॅडबरी चौक, यासह चार ठिकाणी आंदोलन केले. रास्ता रोकोपूर्वी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रास्ता रोको आंदोलनास अटकाव करीत आंदोलनकर्त्यांना अटक केली. यामध्ये आंदोलक दत्ता चव्हाण, डॉ. पांडुरंग भोसले, कृष्णा पाटील, दिनेश पवार, निखिल जाधव, सागर भोसले यांच्यासह सुमारे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली.