ठाण्यात उद्या मराठा क्रांती मोर्चाची बाइक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:35 AM2017-08-05T02:35:09+5:302017-08-05T02:35:09+5:30
एक मराठा लाख मराठा, अशी गर्जना करत मराठा क्रांती मोर्चा आॅगस्ट क्रांतीदिनी (९ आॅगस्ट) मुंबईत धडकणार आहे. त्याची जय्यत तयारी मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यात सुरू आहे.
ठाणे : एक मराठा लाख मराठा, अशी गर्जना करत मराठा क्रांती मोर्चा आॅगस्ट क्रांतीदिनी (९ आॅगस्ट) मुंबईत धडकणार आहे. त्याची जय्यत तयारी मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यात सुरू आहे. त्याच्या वातावरणनिर्मितीसाठी ६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तीनहातनाका येथून बाइक रॅली काढली जाणार आहे.
मुंबईमध्ये धडकणाºया ५८ व्या मराठा क्रांती मोर्चामध्ये ठाणेकरांना सहभागी करण्यासाठी ठाण्यात विभागनिहाय बैठका होत आहेत. जनजागृती करून स्वयंसेवक हे सोशल मीडियासह कॉर्नर बैठका घेत आहेत. विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सारे मुंबईतील हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या बाइक रॅलीसाठी तीनहातनाका येथे सर्व कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. त्यानंतर, ती ठाणे शहरातून घोडबंदर रोडवरील कासारवडवलीपर्यंत जाईल. तर पोखरण रोड क्र मांक-१ वरून शिवाईनगरमार्गे तिचा तलावपाळी येथील शिवाजी पुतळ्याजवळ समारोप होणार आहे.
रेल्वेव्यतिरिक्त वाहनांनी मुंबई गाठणाºया मोर्चेकºयांना दिशा दाखवण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याची तयारीदेखील ठाणेकर करत आहेत. एवढेच नाही तर मुरबाड, शहापूरमध्ये पाण्याचीही व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, भिवंडी, नवी मुंबई, पालघर, उल्हासनगर, आंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथे मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे.