राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा क्रांतीचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 10:03 PM2019-08-25T22:03:19+5:302019-08-25T22:09:10+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे काढून दोन ठोक मोर्चे काढले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर दाखल झालेले ३०७ आणि ३५३ या कलमांसह सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मोर्चा सोमवारी पुन्हा मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली.
ठाणे : मराठा आंदोलन काळात राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवर दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांसह सरसकट सर्वच गुन्हे मागे घ्यावेत, तसेच अन्य प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा न काढल्यामुळे २६ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मुंंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय असा पुन्हा निर्वाणीचा मोर्चा काढण्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी रविवारी ठाण्यात दिला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे काढून दोन ठोक मोर्चे काढले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर भादंवि ३०७ आणि ३५३ (सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाºयांवर हल्ला करणे) या कलमांसह सर्व गुन्हे मागे घ्यावेत. यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. तरीही, मंत्रालयीन अधिकाºयांमुळे हे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. अशा सामान्य विभागाच्या अधिकाºयांवर निलंबनाच्या कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना तसेच आरक्षणाचा मराठा समाजाला कुठेही फायदा झालेला नाही. उलट, २०१४ पासून या समाजातील युवक हा शिक्षण आणि नोकरीतून हद्दपार झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारसोबत आतापर्यंत अनेक वेळा बैठका झाल्या. परंतु, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यातूनच मराठा तरुणांवर मोठा अन्याय झाला आहे. विद्यार्थी आणि शेतकºयांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाने आता थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आदेश असूनही शासन निर्णय घेत नाही. यातूनच सरकार आणि शासन मिळून समाजाची दिशाभूल करीत आहे, अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे. २०१४ पासून २०१९ पर्यंतच्या मराठा विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सारथी प्रशिक्षण संस्था मराठा समाजासाठीच सीमित करावी. ७२ हजार मेगाभरतीतील विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तातडीने अनुदानासहित कर्ज द्यावे. अन्यथा, हे महामंडळ बंद करावे. महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. पीकविमा तातडीने शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करावा, आदी मागण्यांसाठी २६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. समन्वयक आणि विद्यार्थ्यांना या आंदोलनात अडवल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस सुनील नागणे, राजेंद्र निकम, सूर्यकांत पोळ, तेजेंद्र पोटे, दीपक म्हापदी, तानाजी नांगरे आदी उपस्थित होते.