मराठा मोर्चा, नेवाळी दंगलीकरिता चौकशी, पोलिसांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 04:33 AM2018-08-31T04:33:19+5:302018-08-31T04:33:56+5:30
अरुण फरेरा नजरकैदेत : तरुणांना हिंसेकरिता फूस लावल्याचा संशय
जितेंद्र कालेकर/प्रज्ञा म्हात्रे ।
ठाणे : नक्षली चळवळीला प्रोत्साहित करणे, प्रेरणा देणे, या आरोपाखाली ठाण्यातील घरात नजरकैदेत ठेवलेल्या अॅड. अरुण फरेरा यांच्यावर यापूर्वी नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आदी जिल्ह्यांत दाखल गुन्ह्यांमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मात्र, आता नेवाळी येथील जनक्षोभ, मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने ठाण्यात झालेली दंगल यामध्ये सहभागी लोकांना फरेरा यांची फूस होती किंवा कसे, याचा तपास पोलीस करत आहेत.
फरेरा हे वकील असून चरईतील शेरॉन इमारतीमध्ये सासूच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. फरेरा यांची सासू वांद्रे येथे राहते व तिचा ठाण्यात फ्लॅट आहे, असे समजते. सध्या शेरॉन इमारत व परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. फरेरा यांचे निवासस्थान पुण्यातील एटीएस अधिकाऱ्यांच्या ताब्यात असून ते गुरुवारी पहाटेपासून फरेरा यांची कसून चौकशी करत आहेत. इमारतीमधील रहिवासीवगळता कुणालाही इमारतीच्या आवारात प्रवेशाला बंदी केलेली आहे. रातोरात या परिसरात सीसीटीव्ही बसवले असून तेथील हालचालींवर थेट पोलीस उपायुक्तांचे बारीक लक्ष आहे. वाहिन्या व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी दिवसभर फरेरा यांच्या घराबाहेर डेरेदाखल होते. मात्र, पोलीस सतत त्यांना हुसकावून लावत होते.
फरेरा हे दोन दिवसांपूर्वी कोरेगाव भीमा दंगलीतील आरोपींचे वकीलपत्र घेतल्याने पुण्याला गेले होते. पुणे न्यायालयात त्यांनी काही कागदपत्रे सादर केली. तेथून परतताच पुण्याच्या एटीएस पथकाच्या अधिकाºयांनी त्याला ताब्यात घेतले. पुणे पोलिसांनी नेमकी कोणत्या पुराव्याच्या आधारे ही कारवाई केली, याची माहिती नसल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.
फरेरा यांच्यावर यापूर्वीही नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आदी जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. मात्र, या सर्व गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. डाव्या विचारांची चळवळ शहरी भागात रुजवणे व त्याकरिता तरुणांना प्रोत्साहित करणे, या दिशेने पुणे पोलीस तपास करत आहे. नेवाळी येथे ग्रामस्थांकडील जमिनी परत घेण्यावरून सुमारे दीड वर्षापूर्वी हिंसाचार झाला होता. मराठा क्रांती मोर्चाने अलीकडेच आयोजित केलेल्या ठोक मोर्चामध्ये सहभागी तरुणांनी दंगल केली होती. शहरी भागातील असंतोष संघटित करून तरुणांना नक्षली विचारांची दीक्षा देण्याचे व हिंसाचाराला प्रोत्साहित करण्याचे काम फरेरा करत होते किंवा कसे, याची चौकशी सुरू आहे. फरेरा यांच्याकडून काही आक्षेपार्ह साहित्य मिळाले आहे. पण, केवळ साहित्याच्या आधारे त्यांनी नक्षली चळवळीला थेट मदत केल्याचे उघड होत नसल्याचे पोलिसांनी कबूल केले. सध्या नजरकैदेत असलेल्या फरेरा यांचा शहरी हिंसाचारातील सहभाग आहे किंवा कसे, याचाच शोध पोलीस घेत आहेत.
त्याला पाहिले, पण ओळख नाही
च्‘शेरॉन’ इमारत व आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये वास्तव्य करणारे काही रहिवासी फरेरा यांना ओळखतात, तर काहींना फरेरा कोण हेच माहीत नाही. मात्र, फरेरा यांना जे ओळखतात, त्यांचा ते नक्षली चळवळीशी संबंधित असल्यावर विश्वास बसत नाही. समोरील सिद्धी टॉवरमधील सुनंदा शिंदे यांनी सांगितले की, फरेरा याला आपण पाहिले आहे. पण, त्यांच्याशी ओळख नाही. इमारत नवीन असल्यामुळे तिथे अनेकजण नव्याने राहायला आले आहेत. याच इमारतीमधील अन्य एका रहिवाशाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर जे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहे, ते बरोबर आहे. पण, याबद्दल भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
ही पुणे पोलिसांची कारवाई आहे. त्यामुळे फरेरा याच्यावरील आरोपांसंदर्भात काहीच भाष्य करता येणार नाही. केवळ काही काळ त्याचे वास्तव्य ठाणे शहरात असल्यामुळे नौपाडा पोलिसांचे एक पथक त्याच्या घराजवळ नजर ठेवून आहे.
- डॉ. डी.एस. स्वामी, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर
च्बिडवई हाउसमधील प्रकाश चांगण म्हणाले की, फरेरांबद्दल प्रसारमाध्यमांतून माहिती मिळाली. त्यांची सासू इथे राहते, हे माहीत होते. पण, अरुण फरेरा यांचे वास्तव्य कधीपासून आहे, ते माहीत नाही. शेरॉन इमारतीच्या बाजूला वास्तव्याला असलेल्या दीपक भरोसे, मन्नू पांडे हे दुकानदार फरेरा, त्यांची अटक या विषयाबद्दल अनभिज्ञ असल्याचे सांगितले.
च्चरईतील शेरॉन इमारतीच्या परिसरात गुरुवारी शांतता होती. पोलीस पाहून थबकणाºया रहिवाशांकडे विचारणा केल्यास काही बोलायला तयार नव्हते, तर काहींनी चक्क पळ काढला. एका चहावाल्याने सांगितले की, मला इथे येऊन सहा महिने झाले. बातमी वाचली तेव्हा या व्यक्तीबद्दल समजले. शांती पार्क इमारतीतील रहिवाशांना ही बातमी वाचून धक्का बसला. ते अशा प्रकरणात गुंतलेले असतील असे आमच्या ध्यानीमनीही नव्हते. साधा, सरळ माणूस आहे. कधीकाळी त्यांच्याशी हाय, हॅलो व्हायचे, असे त्यांनी सांगितले.