मराठा मोर्चा : दंगलीतील संशयितांना ठाणे पोलिसांची मारहाण : नितेश राणे यांनी केली चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:39 PM2018-07-30T22:39:51+5:302018-07-30T22:45:37+5:30

आंदोलनातील अनेक संशयितांना नाहक अडकवण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंता यांचाही समावेश आहे. सनील राजिवडे (२३) या ठाण्याच्या चंदनवाडीतील तरुणाला चौकशीसाठी बोलावून नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केली असून याप्रकरणी पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी आमदार नितेश राणे यांनी त्यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.

 Maratha Morcha: Thane police assault riot accused: Nitesh Rane demands inquiry | मराठा मोर्चा : दंगलीतील संशयितांना ठाणे पोलिसांची मारहाण : नितेश राणे यांनी केली चौकशीची मागणी

आरक्षण सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून

Next
ठळक मुद्देपोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची घेतली भेट सनील राजिवडेला चौकशीसाठी बोलवून मारहाणआरक्षण सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून

ठाणे : ठाण्यात मराठा आरक्षणासाठी २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेक तरुणांची धरपकड करून अनेकांना अटक केली. काहींना संशयावरून घरातून उचलून नाहक मारहाण केली जात आहे. या मारहाणीची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी आमदार नितेश राणे यांनी सोमवारी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली. कलम ३०७ मुळे या तरुणांचे करिअर उद्ध्वस्त होणार असल्यामुळे हे कलमही मागे घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाण्यात बुधवारी ‘ठोक मोर्चा’ काढला होता. यावेळी बंद आणि रास्ता रोकोही झाले. मात्र, अचानक नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावापैकी काहींनी पोलिसांवर दगडफेक करून अनेक वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी ठाण्यात आतापर्यंत ५४ जणांना अटक केली आहे. तर, ४५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. उर्वरित अनेकांची चौकशी करून सोडण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राणे यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या आंदोलनातील अनेक संशयितांना नाहक अडकवण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंता यांचाही समावेश आहे. जे आंदोलनाच्या दिवशी घरी दिवसभर होते, अशांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अगदी ३०७ सारख्या खुनाच्या प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. अशा कलमाने या मुलांचे करिअरच उद्ध्वस्त होणार असल्यामुळे ते आधी मागे घेण्याची त्यांनी आयुक्तांकडे मागणी केली. त्यावेळी आयुक्त सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.
................................
सनील राजिवडे (२३) या ठाण्याच्या चंदनवाडीतील तरुणाला चौकशीसाठी बोलावून नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी आमदार राणे यांच्याकडे केली. याप्रकरणीही मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.
........................
आरक्षण सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून
मराठा समाजाला आरक्षण देणे, हे राज्य सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. शिवसेनेने आतापर्यंत आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. आता नारायण राणे यांनी यात महत्त्वाची भूमिका घेतल्याने केवळ राणेंना श्रेय नको म्हणून शिवसेनेनेही आता आरक्षणाची मागणी केली आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे कसले आले शहाणपण, असा चिमटाही त्यांनी काढला. आरक्षण द्यायचेच झाले तर अनेक तोडगे आहेत. पण, राज्य सरकारने यात वेळकाढूपणा करूनये, अशी अपेक्षा आहे. समाजासाठी बांधीलकी असल्यामुळे आरक्षण मिळवून देण्याची राणे कुटुंबीयांचीही जबाबदारी असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.

Web Title:  Maratha Morcha: Thane police assault riot accused: Nitesh Rane demands inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.