मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाचा बेमुदत साखळी उपोषणाचा एल्गार
By धीरज परब | Published: November 1, 2023 07:50 PM2023-11-01T19:50:15+5:302023-11-01T19:50:41+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षणची मागणी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाने बुधवार १ नोव्हेम्बर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे .
मीरारोड - मराठा आरक्षणची मागणी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाने बुधवार १ नोव्हेम्बर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या स्थानिक नेते - पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होत मराठा समाजास आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मीरा भाईंदर सकल मराठा समाजाच्या वतीने भाईंदर पूर्वेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ( गोल्डन नेस्ट सर्कल ) येथे बुधवार पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे . रोज ७ मराठा समाज बांधव साखळी उपोषण करणार आहेत . आज साखळी उपोषणाच्या पहिल्या माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम , जयलक्ष्मी सावंत, लक्ष्मण पाटील, सुभाष काशीद, सचिन पोपळे, अंकुश मालुसरे , मनोज राणे व संतोष गोळे हे उपोषणास बसले होते.
या आंदोलनास शिवसेना आमदार प्रताप सरनाईक , माजी काँग्रेस आमदार मुझफ्फर हुसेन , भाजपचे नरेंद्र मेहता, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी किमान वेतन महामंडळ अध्यक्ष आसिफ शेख , माजी नगरसेवक दिनेश नलावडे, अनिल सावंत , प्रमोद सामंत , अनिल भोसले , शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटक स्नेहल सावंत तसेच मराठा संघाचे सुरेश दळवी , रमेश पवार , देविदास सावंत , राजाराम सावंत आदींसह अनेक मराठा समाज बांधव उपोषण स्थळी जमले होते.
मुस्लिम समाजाचे अजीम तांबोळी सह अनेक मुस्लिम संस्था - संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनात सहभागी होऊन मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्य उपोषणास पाठिंबा दर्शवला . आ . सरनाईक यांनी , आपण समाजाच्या सोबतच असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शासन हे लवकरच यावर तोडगा काढेल व जास्तकाळ आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
मराठा आरक्षण आता घेतल्या शिवाय राहणार नाही . आमचे आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गाने सुरु असताना सरकार मधील भाजपा पक्षाच्या नेत्यां कडून मराठा समाजासाठी जीवाची पर्वा न करता लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्ये करत मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही आंदोलकांनी केला.
आम्हाला पक्ष वा कोणा नेत्याचा विरोध नसून राजकारण सुद्धा करायचे नाही . मात्र आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आंदोलनात व मराठा समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत असा इशारा यावेळी मराठा आंदोलकांनी दिला .