मॉरिशसचे मराठी कलाकार अवतरणार ठाण्यात, ’हा जावई’चा नाट्यप्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 04:38 PM2018-04-01T16:38:15+5:302018-04-01T16:38:15+5:30
इंग्रज राजवटीत दीडशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातून मॉरिशसला गेलेले मराठी बांधव मॉरिशसवासी झाले, परंतु आपल्या जन्मभू्मिची नाळ त्यांनी तोडली नाही.
ठाणे - इंग्रज राजवटीत दीडशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातून मॉरिशसला गेलेले मराठी बांधव मॉरिशसवासी झाले, परंतु आपल्या जन्मभू्मिची नाळ त्यांनी तोडली नाही. मॉरिशसच्या मातीशी एकरूप झाले परंतु मराठी भाषा, मराठी सण, मराठी संस्कृती आजही त्यांनी जपून ठेवली असून त्याचा प्रत्यय सोमवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता ठाणेकर नाट्यरसिकांना अनुभवायला मिळणार आहे. मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सोना घूर्मे यांनी लिखित 'हा जावई' मारिशस नाट्य स्पर्धेतील विजयी नाटक माॅरिशसचे कलाकार सादर करणार आहेत.
ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के, उप आयुक्त संदीप माळवी, माॅरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जून पुतलाजी यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी ४.३० वाजता डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
१९७७ पासून मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने मराठी नाटक महोत्सव आयोजित केला जात आहे. मॉरिशसमध्ये स्थायिक असणारे हे मराठी कलाकार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून खास ठाणेकर रसिकांसाठी ‘हा जावई’चा खास प्रयोग विनामुल्य ठेवण्यात आला आहे. तरी ठाणेकर रसिकांनी या नाट्य पर्वणीचा लाभ घ्यावा. मॉरिशसमध्ये विविध क्षेत्रात मराठी बांधव आपला वेगळा ठसा उमटवत आहे यामध्ये वैद्यकीय,अभियांत्रिकी,कायदा,अभिनय,राजकारण, प्रशासन या सर्वच क्षेत्रात ते अग्रेसर आहेत. मॉरिशसच्या विकासातील आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात मराठी बांधवांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
मॉरिशस येथे नाट्यप्रेमीच्या कौतुकास पात्र ठरलेल्या या नाटकाचे लेखन सोम्या धर्म्या यांनी केले असून यशवंत धर्म्या यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. भारतात कोणत्याही प्रांतात,कोणत्याही जाती धर्मात आपला जन्म झाला असला तरी, आपण पहिले आणि अंतिमत: भारतीय असून आपण समस्त मानव जातीमध्ये प्रत्येकाच्या हृदयात प्रेम, आपुलकी, विश्वबंधुता मानवता कायम प्रस्थापित केली पाहिजे, असा संदेश देणारे ‘हा जावई’ हे नाटक खास ठाणेकर रसिकांच्या भेटीला येत अाहे