आणि दुकानांवर मराठी पाट्या लागल्या
By अजित मांडके | Published: January 25, 2024 04:08 PM2024-01-25T16:08:02+5:302024-01-25T16:08:51+5:30
अशा दुकानदारांच्या बाबतीत महापालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही, याचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने सुरू केले होते. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत शहरातील २४८० दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. परंतु त्याचा चांगला परिणाम ठाण्यात काही प्रमाणात का होईना दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या आहेत. मात्र काही ठिकाणी प्रशासनाला दिसाव्या म्हणून फ्लेक्सच्या स्वरुपात पाट्या लावण्यात आल्याचे चित्रही दिसत आहे. तर काही दुकानांवर आधी इंग्रजी नंतर मराठी अशा स्वरुपाच्या पाट्या दिसत आहे. तर काहींनी प्रामाणिकपणे सुरवातीला मराठी नंतर इंग्रजीला महत्व दिले आहे. त्यामुळे अशा दुकानदारांच्या बाबतीत महापालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.
दुकाने व विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचननेनुसार महापालिका, नगरपंचायत व नगरपरिषदेला कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मराठी पाट्या नसलेल्या दुकाने आणि विविध आस्थापनांना नोटीसा बजावण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईसाठी त्यांनी शहरातील नऊ प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. सहाय्यक आयुक्तांनी पथके तयार करून शहरात दुकानांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यात दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत कि नाही याची खातरजमा करण्यात येत आहे. प्रत्येक आस्थापनेचा नामफलकावरील अक्षर मराठी भाषेत आहेत का, मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान आहे का, याची तपासणी पथकाकडून केली जात आहे. या दुकानांना ३० डिसेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या बसविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. या मुदतीनंतरही पाट्या मराठीत झाल्यानंतर कामगार विभागाला तसा अहवाल पाठविण्यात येईल. कारण कारवाईचे अधिकार या विभागाला असल्याने त्यांच्याकडून मात्र अद्यापही कोणत्याही स्वरुपाची कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही.
दरम्यान सध्या ठाणे महापालिकेने शहरातील २४८० दुकानादारांना ३० डिसेंबर पर्यंत नोटीस बजावल्या आहेत. त्यानंतर, आता शहरात दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या आहेत. काहींनी प्रशासनाचे नियमांचे पालन केल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. मात्र काही दुकानांदारांनी यातूनही पळवाटा काढल्याचे चित्र आहे. काहींनी नवीन मराठी पाट्या लावण्याचा खर्च वाढेल म्हणून बॅनर फ्लेक्स तयार करुन तात्पुरत्या स्वरुपात दुकानावर चढविल्याचे दिसत आहे. दुसरीकडे काहींनी मराठीला दुसºया नंबरवर ठेवून इंग्रजीला पहिले महत्व दिले आहे. तर काहींनी मराठीला आधी प्राधान्य दिल्याचे समाधानकारक चित्र आहे. एकूणच न्यायालयाच्या दट्यानंतर दुकानदारांनी किमान मराठीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.
मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांची आकडेवारी
प्रभाग समिती - मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांची संख्या
कोपरी-नौपाडा - ४४७
माजिवाडा-मानपाडा - २०९
लोकमान्य-सावरकरनगर - २७८
उथळसर - ४२०
वर्तकनगर - १००
कळवा - ११९
मुंब्रा - ३६०
दिवा - २२५
वागळे इस्टेट - ३२२
एकूण - २४८०