जन्म महाराष्ट्रात झाल्याने मराठी येते, पंचम कलानी यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:29 AM2018-12-29T02:29:08+5:302018-12-29T02:30:55+5:30
मी महाराष्ट्रात जन्माला आल्याने मला मराठी येते, अशी प्रतिक्रिया महापौर पंचम कलानी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पुढील महासभेत मराठीतून बोलणार असून काही जण मराठी-सिंधी वाद जाणीवपूर्वक निर्माण करत असल्याचे त्या म्हणाल्या.
उल्हासनगर : मी महाराष्ट्रात जन्माला आल्याने मला मराठी येते, अशी प्रतिक्रिया महापौर पंचम कलानी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पुढील महासभेत मराठीतून बोलणार असून काही जण मराठी-सिंधी वाद जाणीवपूर्वक निर्माण करत असल्याचे त्या म्हणाल्या. एकूणच त्यांनी मराठी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
उल्हासनगर महापालिका महासभेत पाणीप्रश्नावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी भाजपाच्या एका नगरसेवकाने पाण्याची समस्या मांडल्यानंतर पुन्हा सिंधी व हिंदी भाषेतून महापौरांना सांगितले. पाणीप्रश्नावर महापौर अथवा आयुक्तांनी प्रतिक्रिया न दिल्याने पुन्हा नगरसेवकांनी मराठीतून पाण्याची समस्या मांडली. त्यावेळी मला मराठी येत नाही, सिंधी भाषेत बोला, असे महापौर कलानी यांनी सभागृहात सांगितले. महापौरांना मराठी येत नाही, या वाक्यावर कोणत्याही मराठी नगरसेवकाने व मराठी प्रेम जपणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रतिक्रिया दिली नाही. दुसºया दिवशी मनसेने महापौरांच्या मला मराठी येत नाही, या वाक्याचा निषेध करून महापौरांना मराठी येत नसेल, तर महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका घेत मराठीचे बाराखडी पुस्तक देण्याचे संकेत दिल्याने एकच खळबळ उडाली.
मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मराठी भाषेवर शिवसेना तोंडघशी पडली असून शहरात मराठी व सिंधी भाषेचा वाद निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. सोशल मीडियावर महापौरांना मराठी येत नसेल, तर महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली. शहरातील वातावरण बघून महापौर कलानी यांनी शुक्रवारी आपल्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला. माझा जन्म महाराष्ट्रात झाला असून मला मराठी येते, असे सांगून पुढील महासभेत मराठी भाषेत बोलणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपाचे नगरसेवक व माझ्यात गमतीचे बोलणे सुरू होते. त्या बोलण्याचा काही जणांनी विपर्यास केला. महापौर कलानी यांनी मराठी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
महापौरांनी माफी मागावी
महासभेत महापौर पंचम कलानी यांनी मला मराठी येत नाही, असे म्हटले होते. पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांना महासभेत जबाबदारीने बोलावे लागते. मला मराठी येत नाही, असे महापौरांनी गमतीने म्हटले असले, तरी मराठी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. महापौरांनी याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली आहे.