हिंदी भाषा भवन विरोधात मराठी एकीकरण समितीचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 07:37 PM2022-11-26T19:37:11+5:302022-11-26T19:39:00+5:30

हिंदी भाषा भवनच्या अंतर्गत सजावटीसाठी राज्य सरकारकडून १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

Marathi Ekikaran Samiti protest against Hindi Bhasha Bhavan | हिंदी भाषा भवन विरोधात मराठी एकीकरण समितीचे आंदोलन

हिंदी भाषा भवन विरोधात मराठी एकीकरण समितीचे आंदोलन

googlenewsNext

मीरारोड - आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार मीरा भाईंदर महापालिकेने मीरारोडच्या हाटकेश भागात सुविधा भूखंडात हिंदी भाषा भवनचे भूमिपूजन रविवारी आयोजित केले असून त्याला मराठी एकीकरण समितीने विरोध करत आंदोलन चालवले आहे. मराठी राजभाषा असून मराठी भाषा भवन हवे असताना हिंदी भाषिकांच्या मतांसाठी व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी असले प्रकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे हिंदी भाषा भवनचे भूमिपूजन वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. 

ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये विकासकांकडून उपलब्ध होणाऱ्या नागरी सुविधा भूखंड तसेच शासकीय जमिनीवर विविध भाषी तसेच समाजांच्या नावाने इमारती उभारण्याच्या कामांची भूमिपूजन चालवली आहेत. नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन, वारकरी भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन यांची भूमिपूजने सुद्धा नुकतीच करण्यात आली आहेत. आता रविवार २७ नोव्हेंबर रोजी हरिवंशराय बच्चन हिंदी भाषा भवन चे भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजनसाठी उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री स्वतंत्र देव सिंह, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, अभिनेते जितेंद्र कपूर आदींसह उत्तर भारतीय समाजातील नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी हिंदी भाषी कार्यक्रमांचे आयोजन भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. 

हिंदी भाषा भवनच्या अंतर्गत सजावटीसाठी राज्य सरकारकडून १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.  भवनाची इमारत 'कन्स्ट्रक्शन टीडीआर'च्या माध्यमातून उभी राहणार आहे. हिंदी भाषिकही शहरात मोठी असल्याने हिंदी भाषा भवन होत आहे. या हिंदी भाषा भवनात हिंदी साहित्यविषयक कार्यक्रम होतील. हिंदी पुस्तके, कवी संमेलने, परिसंवाद, व्याख्यानमाला, नाटके असे कार्यक्रम होऊ शकतात. चांगल्या कामात कोणीही विनाकारण फक्त प्रसिद्धीसाठी राजकारण करू नये असेही आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान हिंदी भाषा भवन ला मराठी एकीकरण समितीने विरोध करत आंदोलन सुरु केले आहे. मराठी राजभाषेचे भवन हवे असताना आ. सरनाईक मतांसाठी समाजात तेढ निर्माण करत आहेत व महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान करत असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, प्रदीप सामंत आदींनी म्हटले आहे. समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी भाईंदर रेल्वे स्थानक बाहेर हिंदी भाषा भवन विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. तर आधी काशीमीरा नका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ उपोषण सुरु केले. पालिका आणि पोलिसांनी तेथून त्यांना हटवल्यावर उड्डाणपुला खाली उपोषण सुरु केले. पोलिसांकडून सातत्याने कारवाईचा इशारा दिला जातोय. 

हिंदी भाषा भवन विरोधात गेल्या काही महिन्यांपासून आम्ही तक्रारी दिल्या आहेत. मुळात हा सर्वच नागरिकांसाठीचा सुविधा भूखंड आहे. त्या ठिकाणी विशिष्ट भाषा - समाजाच्या अनुषंगाने वापर व बांधकाम करता येत नाही. महासभेने दिलेले मुन्शी प्रेमचंद यांचे नाव पालिकेने बदलून बच्चन केले आहे. हिंदी भाषिकांसाठी चे भवन म्हणजे हा मराठी भाषा व महाराष्ट्राचा अपमान असून मतांच्या लाचारीसाठी मराठी व महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. 
 

Web Title: Marathi Ekikaran Samiti protest against Hindi Bhasha Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.