मराठी भाषादिनी रंगला मराठी उद्योजकांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:02 PM2021-02-27T16:02:58+5:302021-02-27T16:03:21+5:30
ठाण्यात 'उद्यम ठाणे' परिवाराचा अनोखा सोहळा
ठाणे : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मराठी उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा अनोखा उपक्रम उद्यम ठाणे परिवाराने आज केला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर udyamthane.org या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले होते. त्याचवेळी मराठी राजभाषा दिनी उद्यम परिवाराच्या मराठी उद्योजकांचा मेळा आयोजित करण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या सोहळ्यात लाखोंच्या घरात असलेला उद्यम परिवाराचा व्यवसाय कोटीच्या कोटी उड्डाणांपर्यंत पोहोचवण्याचाही संकल्प सोडण्यात आला.
ठाणे 'चाकरमान्यांचे' शहर म्हणून गेल्या काही वर्षांत नावारूपाला आले आहे. या शहराची हीच ओळख पुसून शहराला उद्योजकतेच्या वाटेवर नेण्याचा 'उद्यम ठाणे' या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न मागील वर्षीपासून काही नवउद्योजक व होतकरु तरुणांनी सुरु केला आहे. त्याही पुढे जात 'उद्यम ठाणे'ने घटस्थापनेच्या मुहुर्तावर संकेतस्थळाचे अनावरण केले होते. यावेळी ठाण्याच्या इतिहासातील मराठी उद्योजकांची पहिलीच डिजीटल सूची प्रकाशित करण्यात आली हाेती. त्यामध्ये भर पाडून आता ७५० मराठी उद्योजकांची मोट 'उद्यम'ने बांधली. या सर्व उद्योजकांना एकाच व्यासपीठावर मराठी भाषादिनी आणले जाणार होते. मात्र कोरोना काळातील सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आज ५० उद्योजकांनी मराठी राजभाषा दिन विशेष उद्योजक मेळ्याला हजेरी लावली.
पिन टू पियानो क्षेत्रात घोडदौड
कला - मनोरंजन, खाद्यान्न, दुकाने व आस्थापना, प्रवास व वाहतूक, मार्गदर्शन - व्यावसाय, माहिती तंत्रज्ञान, यांत्रिक, वस्त्र भांडार, विमा - कर्जसाहाय्य, शैक्षणिक, सेवा - संसाधन, स्थावर मालमत्ता आदी क्षेत्रात उद्यम ठाणे परिवाराची घौडदौड सुरू आहे. या प्रत्येक क्षेत्रातील उद्योजक आज झालेल्या मेळ्याला हजर होता. त्यांनी या क्षेत्रातील संधी व व्यावसायिक मागणीची इतर उद्योजक वर्गासोबत आदान प्रदान केले. भविष्यात 'उद्यम' परिवार निश्चितच कोटीच्या कोटी उड्डाणे घेईल हा विश्वास उद्यमचे अतुल पिंगळे यांनी व्यक्त केला.
नोंदणी करा...मराठी उद्योजकांना पाठबळ द्या!
udyamthane.org संकेतस्थळाला भेट देऊन मराठी उद्योजकांच्या डिजीटल सुचीवर क्लिक केल्यास निश्चित मराठी उद्योजकांच्या चळवळीला पाठबळ मिळेल. तसेच रोजच्या जीवनातील शेकडो वस्तू, सेवा, खाद्यपदार्थ सर्व एका क्लिकवर 'उद्यम ठाणे' येथे उपलब्ध होणार आहेत, असेही पिंगळे यांनी सांगितले.