मराठी ग्रंथ संग्रहालय वाचकांसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:09+5:302021-06-09T04:50:09+5:30
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रंथालये बंद होती. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर १२८ वर्षांची परंपरा असलेले मराठी ग्रंथ संग्रहालय ...
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रंथालये बंद होती. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर १२८ वर्षांची परंपरा असलेले मराठी ग्रंथ संग्रहालय पुन्हा एकदा वाचकांसाठी सज्ज झाले आहे. लॉकडाऊनचे नियम पाळत ९ जूनपासून पुस्तक देवाणघेवाण सुरू होत आहे.
लॉकडाऊन काळात १५ एप्रिलपासून मराठी ग्रंथालय बंद होते. दीड महिन्याने पुन्हा एकदा ग्रंथालय वाचकांच्या सेवेत रुजू झाले आहे. ग्रंथ संग्रहालय सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी मात्र बंद राहील. बुधवारी वाचकांचे आम्ही स्वागत करणार आहोत, असे कार्यवाह संजीव फडके यांनी सांगितले. वाचनालयापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या वाचकांसाठी ग्रंथयान सुरू केले होते. यात ८ ते १० हजार पुस्तके असून एक हजारांच्या आसपास सदस्य होते. आता ग्रंथयान दोन दिवसांत वाचकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे घरबसल्या वाचकांना पुस्तकांची मेजवानी मिळणार आहे. अभ्यासिका ५० टक्के क्षमतेने चालू करण्यात येणार आहे. अभ्यासिकेत १०० विद्यार्थी अभ्यासाला येत होते. संस्थेचे सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० टक्के क्षमतेने वापरासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे फडके म्हणाले.
------------------
सदस्यसंख्या वाढविण्यावर भर
कोरोनामुळे संस्थेचे सदस्य कमी झाले असल्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून सदस्यसंख्या वाढविण्यावर भर देणार आहे. ग्रंथालयाचे तीन ते चार हजार सदस्य होते. ही संख्या एक हजारावर आली आहे, असे फडके यांनी सांगितले.
------------------
फोन अ बुक सुरू करण्याचा निर्णय
वाचकांसाठी फोन अ बुक सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. जी पुस्तके तुम्हाला हवी आहेत ती फोन करून सांगितल्यावर वाचकांना घरपोच देण्याची ही संकल्पना आहे.