मराठी साहित्य अनुवादित होत नसल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही : मधु मंगेश कर्णिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:33 PM2019-11-24T17:33:30+5:302019-11-24T17:35:53+5:30
मराठी साहित्य परिषद आयोजित एक दिवसीय कथा महोत्सवाचे मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
ठाणे: दर्जेदार लेखन मराठी साहित्यात असूनही केवळ ते अनुवादीत न झाल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही अशी खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केली.
मराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय कथा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कर्णिक उपस्थित होते. ते म्हणाले, कथा या वाड्.मय प्रकाराला मराठी साहित्य परिषदेने महोत्सवाचे स्वरुप दिले याचा आनंद आहे. कोणतीही निर्मिती हा सृजनाचा उत्सव असतो. नजरेने देखावा पाहतो आणि दृष्टी ही पलिकडचे पाहत असते. हजारो - लाखो लोकांपैकी थोड्याच लोकांना निर्मिती करावी वाटते त्यांनाच निर्मितीकार, लेखक, कवी म्हणतात. अनेक साहित्यापैकी कथा हा देखील महत्त्वाचा प्रकार आहे. कोणत्याही निर्मितीचा उत्सव करणे हा साहित्यिकाच्या हातात असतो. मी ६० वर्षात ६०० कथा लिहील्या आहेत. मी लिहू लागल्यापासून निर्मितीचा आनंद मिळत गेला. हरिभाऊ, गाडगीळ यांच्या कथांचे आकर्षण अजूनही आहे असे सांगताना ते म्हणाले मराठी कथांचा अनुवाद हा सातासमुद्रापलिकडे गेला पाहिजे. ज्येष्ठ समिक्षक डॉ. अनंत देशमुख म्हणाले की, नविन पिढीच्या लेखकांच्या हातात हात देत आजही मधु मंगेश कर्णिक कार्यरत आहेत. त्यांचे वय थकले असेल पण मन नाही. मसाप, ठाणे जिल्हा शाखेचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी अध्यक्ष डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, कार्याध्यक्ष पद्माकर शिरवाडकर उपस्थित होते. पहिल्या सत्रात मराठी कथा आणि अनुवाद या विषयावरील परिसंवादात चंद्रकांत भोंजाळ, डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे आणि निर्मोही फडके यांनी सहभाग घेतला. नवकथेचे युग संपले आहे का ? या परिसंवादात सुरेखा सबनीस, मोनिका गजेंद्रगडकर आणि किरण येले यांनी आपली मते मांडली.