मराठी नाट्यपरिषद जाणार सातासमुद्रापार!

By admin | Published: March 3, 2016 04:39 AM2016-03-03T04:39:21+5:302016-03-03T04:39:21+5:30

अ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या प्रस्तावित घटनादुरुस्तीत परदेशातही शाखा उघडण्यासाठी तरतूद केल्याने यापुढे परिषदेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार असून कार्यक्षेत्र सातासमुद्रापार विस्तारणार आहे.

Marathi Natya Parishad to be Satasamprayad! | मराठी नाट्यपरिषद जाणार सातासमुद्रापार!

मराठी नाट्यपरिषद जाणार सातासमुद्रापार!

Next

महेंद्र सुके,  ल्ल ठाणे
अ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या प्रस्तावित घटनादुरुस्तीत परदेशातही शाखा उघडण्यासाठी तरतूद केल्याने यापुढे परिषदेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार असून कार्यक्षेत्र सातासमुद्रापार विस्तारणार आहे.
ठाण्यात झालेल्या नाट्यसंमेलनात माजी संमेलनाध्यक्ष फय्याज यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखलही परिषदेने घेतली असून संमेलनाध्यक्षांना नियामक मंडळाचे पदसिद्ध सदस्य म्हणून सामावून घेतले आहे. वर्षभर विविध उपक्रम राबवण्यासाठी त्यांना दीड लाखाचा निधी देण्याची तरतूदही घटनेत करण्यात आली आहे. मात्र, बालनाट्यसंमेलनाध्यक्षांना प्रस्तावित घटनादुरुस्तीत नियामक मंडळाचे सभासद किंवा त्यांच्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली नसल्याने त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाट्यपरिषदेच्या १ डिसेंबर १९९७ पासून प्रचलित असलेल्या घटनेत बदल करण्यासाठी एक घटनादुरुस्ती समिती स्थापन केली होती. गुरुनाथ दळवी या समितीचे अध्यक्ष असून चंद्रकांत येडूरकर, अ‍ॅड. देवेंद्र यादव, आनंद भोसले, सुनील महाजन, बबन गवस आणि नाथा चितळे सदस्य आहेत. या समितीने तयार केलेला सुधारित घटनेचा मसुदा नाट्यपरिषदेला दिला असून त्यावर २० मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. तत्पूर्वी तो परिषदेच्या वेगवेगळ्या शाखांना पाठवण्यात आला असून सभासदांनी मागितल्यास ७५ पानांच्या घटनेचा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात, १९९७ ची प्रचलित घटना, प्रस्तावित बदल आणि बदलाचे कारण याप्रमाणे मुद्देसूद मांडणी करण्यात आली आहे.
संमेलनादरम्यान होणाऱ्या खुल्या अधिवेशनात ठराव मांडण्यात येतात. त्यासाठी या अधिवेशनाच्या सहा तास आधी संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची सभा संमेलनस्थळी घेण्याची तरतूद घटनेत होती. त्यात दुरुस्ती करण्यात आली असून हे ठराव सभासदांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे पाठवावे लागणार आहेत. त्यावर, नियामक मंडळ निर्णय घेऊन ते खुल्या अधिवेशनात मांडले जातील.१या दुरुस्त्यांमध्ये नियामक मंडळाची सभासद संख्या ४५ वरून ६९ करण्याचे प्रस्तावित असून त्यात ६० निवडून आलेले, एक संमेलनाध्यक्ष पदसिद्ध सदस्य आणि आठ घटक संस्थांतून रीतसर निवडून आलेले सभासद असणार आहेत. त्यात निर्माता संघ १, व्यावसायिक नाट्यकलाकार संघ १, नाटककार संघ १, हौशी रंगमंच संघटना १, बालरंगभूमी १, रंगमंच कामगार संघटना १, नाट्य व्यवस्थापक संघ १ आणि प्रायोगिक रंगमंच संघटनेचे १ असे एकूण आठ सभासद असणार आहेत.
२नाट्यसंमेलनाध्यक्षांना नियामक मंडळात स्थान मिळणार असले तरी, बालनाट्यसंमेलनाध्यक्षांना या दुरुस्तीत स्थान मिळाले नाही. तशी सूचना येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नियामक मंडळाच्या सभासदाला ७५ वर्षे वयाची अट घालण्यात आली असून कार्यकारी समितीची सदस्यसंख्या १५ वरून १९ करण्यात येणार आहे.संमेलनाध्यक्षांचा कार्यकाळ वर्षभराचाच, पण...
नाट्यसंमेलनाध्यक्षांना एक वर्षाचा काळ कमी पडत असल्याची नाराजी ठाण्यात झालेल्या संमेलनादरम्यान व्यक्त करण्यात आली होती. प्रचलित घटनेत दोन वर्षांसाठी संमेलनाध्यक्षांची निवड करावी, असा स्पष्ट उल्लेख नव्हता. दुरुस्तीमध्ये संमेलनाध्यक्ष आपली कारकीर्द आणखी एकच वर्ष पुढे चालवण्यात पात्र असतील, मात्र ती निवड प्रक्रिया नव्या अध्यक्षांची नियुक्ती केल्याप्रमाणेच होईल.

Web Title: Marathi Natya Parishad to be Satasamprayad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.