वडवली रेल्वेपुलासाठी ३१ मार्चची डेडलाइन; दहा वर्षे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:14 AM2020-01-15T01:14:57+5:302020-01-15T01:15:06+5:30
आयुक्त भडकले कंत्राटदारावर; टिटवाळा रुग्णालयाचे काम सहा महिन्यांत मार्गी लावा
कल्याण : शहाड-आंबिवली स्थानकांदरम्यान रेल्वे उड्डाणपुलाचे काम दहा वर्षांपासून रखडले आहे. हे पाहून आमदार, महापौर आवाक्झाले. पुलाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा असे आदेश केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहे. यावेळी आयुक्त कंत्राटदारावर चांगलेच भडकल्याने आयुक्तांचे रुद्र रूप कंत्राटदाराला पाहायला मिळाले. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर आता तरी या पुलाचे काम ३१ मार्चअखेर पूर्ण होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.
कल्याणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा पाहणी दौऱ्याचे आयोजन कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी बोडके, महापौर विनीता राणे, सभागृह नेते श्रेयस समेळ, नगरसेविका नमिता पाटील, नगरसेवक प्रकाश पेणकर, संतोष तरे उपस्थित होते.
कंत्राटदाराला तेथे विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की, जागेच्या वादातून वारंवार कामात अडथळा निर्माण केला जातो. त्यामुळे पुलाच्या बांधणीस विलंब होत आहे. आयुक्तांनी कंत्राटदाराला ताकीद दिली की, आता हयगय नको. पुलाचे काम ३१ मार्चपूर्वी झाले पाहिजे. या दौºयादरम्यान काळू नदीवरील पूल, टिटवाळा रुग्णालयाचे काम, रस्ते विकास, कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालातील आरोग्य सेवा, कल्याण स्कायवॉकची पाहणी करण्यात आली. कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत, अशी मागणी भोईर यांनी केली.
भोईर म्हणाले, टिटवाळा येथील काळू नदीवरील बंधाºयास गळती लागली आहे. त्यामुळे तो नव्याने बांधण्यात यावा, अशी सूचना आयुक्तांकडे केली आहे. टिटवाळा येथील रुग्णालयाचे काम सहा महिन्यांत मार्गी लावले गेले पाहिजे. सध्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात मंजूर वैद्यकीय पदांनुसार निम्मी पदे रिक्त आहेत. ती महापोर्टल पद्धतीमुळे भरली जात नाहीत. त्यामुळे टिटवाळा येथील रुग्णालय महापालिकेने चालवायचे की ते सेवाभावी आरोग्य संस्थेला चालवण्यास द्यावे याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा.
रुक्मिणीबाई रुग्णालयात एमआरआय, सिटी स्कॅन, रेडिओलॉजी विभाग सुरू करावा. शास्त्रीनगर रुग्णालयात ‘क्रेष्णा डायग्नोस्टिक’द्वारे केंद्रीय आरोग्यसेवा पुरवली जाणार आहे. त्याच धर्तीवर रुक्मिणीबाई रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय, रेडीओलॉजीची सेवा सुुरू करण्यात यावी, अशीही मागणी आमदारांनी केली. शास्त्रीनगर रुग्णालयातही सेवा १० फेब्रुवारीपासून सुरू होणे अपेक्षित असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांना सांगितले.
स्कायवॉकचीही केली पाहणी
आमदारांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकची पाहणी केली. स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली. स्कायवॉकच्या स्ट्रक्चरल आडिटचा अंतिम अहवाल आल्यावर त्याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनातर्फे या वेळी सांगण्यात आले.