गांजाची तस्करी करणाऱ्यास मुंब्य्रातून अटक: पाऊण लाखांचा गांजा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:30 PM2020-09-08T23:30:37+5:302020-09-08T23:37:05+5:30
मुंब्रा बाय पास रोडवरील लाल किल्ला ढाब्याच्यासमोर एक व्यक्ती गांजाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे युनिट एकच्या पथकाने राजू शेख याच्याकडून सुमारे साडे चार किलोचा गांजा जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गांजाची तस्करी करणा-या राजू मोहम्मद शेख (५०, रा. शिवडी, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून ७५ हजारांचाा साडे चार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
मुंब्रा बाय पास रोडवरील लाल किल्ला ढाब्याच्यासमोर एक व्यक्ती गांजाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कु-हाडे आणि उपनिरीक्षक सरक यांच्या पथकाने ६ सप्टेंबर रोजी ५.२५ वाजण्याच्या सुमारास या ढाब्याच्यासमोर सापळा लावला. एका बनावट गि-हाईकाच्या मदतीने या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या ताब्यातून चार किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजा ‘अब्बा हुजूर’ नाव असलेल्या पिशवीतून जप्त केला. याशिवाय, मोबाईल आणि काही रोकड असा ७७ हजार १२० रुपयांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत केला. त्याला ७ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याने हा गांजा कुठून आणि कोणाकडून आणला, याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.